कणकवली: महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिल्यानंतर आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे महायुतीच्या उमेदवारांसाठी प्रचारसभा घेणार आहेत. राज ठाकरे हे महायुतीचे रत्नागिरी - सिंधुदुर्गातील उमेदवार नारायण राणे यांच्या प्रचारासाठी ४ मे रोजी कणकवली येथे जाहीर सभा घेणार आहे. कणकवलीमध्ये उप रुग्णालयासमोरील मैदानात राज ठाकरेंची जाहीर सभा होणार आहे.
राज ठाकरे यांच्या सभेमुळे नारायण राणे यांची शक्ती वाढणार, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे. नारायण राणे यांच्या विरोधात महाविकास आघाडीकडून ठाकरे गटाने विनायक राऊत यांना उमेदवारी दिली आहे. एकीकडे राज ठाकरे नारायण राणे यांच्या प्रचारासाठी सहभाग घेणार आहे, तर दुसरीकडे उद्धव ठाकरे विनायक राऊत यांच्यासाठी सभा घेणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे ही निवडणूक कोकणातील असली, तरी ठाकरे विरुद्ध ठाकरे अशी होण्याची शक्यता आहे.