Waqf Amendment Bill: आज लोकसभेत वक्फ दुरुस्ती विधेयक मांडण्यात येणार आहे. आज दुपारी १२ वाजता एनडीए सरकारतर्फे हे विधेयक मांडण्यास सुरुवात झाली असून त्यावर सुमारे ८ तास चर्चा होणार आहे. केंद्रीय मंत्री किरण रिजीजू हे वक्फ सुधारणा विधेयक मांडणार आहेत. दरम्यान याच पार्श्वभूमीवर मुस्लिम बहुल भागात महाराष्ट्र पोलीस अलर्ट मोडवर आले आहेत. कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी मुंबई पोलिसांनीही विशेष खबरदारी घेतली आहे. या बिलाला विरोधकांचा विरोध असला तरी बहुमत हे सरकारच्या बाजून आहे. त्यामुळे हे बिल मंजूर होण्याची शक्यता आहे. मात्र त्यामुळेच मुस्लिमबहुल भागात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. यासाठीच महाराष्ट्र पोलिसांच्या सर्व यंत्रणा या अलर्ट मोडवर ठेवण्यात आलेल्या आहेत.
दुपारपर्यंत वक्फ दुरुस्ती विधेयकाबाबतचं चित्र स्पष्ट झाल्यानंतर अनेक आंदोलन होण्याची शक्यता असून त्याच अनुषंगाने महाराष्ट्र पोलिसांकडून ठिकठिकाणी खबरदारी घेण्यात येत आहे. वक्फ विधेयकाच्या पार्श्वभूमीवर आज महाराष्ट्रासह उत्तर प्रदेश, बिहार मध्येही अलर्ट आहे. अनेक ठिकाणी पोलिसांकडून ड्रोनद्वारे लक्ष ठेवलं जाणार आहे. तसेच संवेदनशील ठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात केला जाणार असल्याची माहिती समोर आली आहे.
वक्फ विधेयकावर बोलण्यासाठी भाजपच्या मित्रपक्षांना फक्त ४० मिनिटं देण्यात येणार आहेत. एनडीएमधील पक्षांना लोकसभेत बोलण्यासाठी ४ तास ४० मिनिटांचा वेळ असेल, त्यापैकी 4 तास भाजपाचेच खासदार बोलणार आहेत. तर मित्रपक्षांना फक्त ४० मिनिटांत विधेयकावर बाजू मांडता येणार आहे.