दिल्ली: बहुचर्चित वक्फ दुरुस्ती विधेयक आज, बुधवारी लोकसभेत सादर होत आहे. या पार्श्वभूमीवर उत्तराखंड वक्फ बोर्डाचे अध्यक्ष शादाब शम्स यांनी या वक्फ दुरुस्ती विधेयकाबाबत महत्त्वाचे विधान केले आहे. वक्फ कायद्यातील सुधारणा ही मोदी सरकार विरुद्ध ७० वर्षांची लढाई आहे आणि जो कोणी या विधेयकाला विरोध करत आहे तो मुस्लिम नाही, असे शादाब शम्स यांनी म्हटले आहे. गरीब मुस्लिमांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून अपेक्षा आहेत आणि म्हणूनच आम्ही या दुरुस्ती विधेयकाला ‘उम्मीद’ असे नाव दिले असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.
वक्फ विधेयकाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या विधेयकाला मुस्लिम नेत्यांसह अन्य विरोधकांनी विरोध केलेला असतानाच उत्तराखंड वक्फ बोर्डाचे अध्यक्ष शादाब शम्स यांनी त्याचे समर्थन केले आहे. केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू हे आशेचा किरण आहेत. पंतप्रधान मोदी सरकारने गरीब मुस्लिमांना मुख्य प्रवाहात आणण्याचा निर्णय घेतला आहे. हा ’७० वर्षे विरुद्ध मोदींचा कार्यकाळ’ लढा असा आहे. विरोधी पक्षाकडे ७० वर्षे होती आणि त्यांनी जे काही करता आले ते केले. त्यांनी वक्फ बोर्ड लुटले. श्रीमंतांनी गरिबांचे हक्क हिरावून घेतले, असा आरोप त्यांनी केला.
संसदीय कामकाजमंत्री किरेन रिजिजू यांनी ८ ऑगस्ट २०२४ रोजी लोकसभेत वक्फ दुरुस्ती विधेयक मांडले होते. त्यावेळी विधेयकावर आक्षेप घेत विरोधकांनी गोंधळ घातला. म्हणून हे विधेयक संयुक्त संसदीय समितीकडे पाठवण्यात आले. आता ते आज, बुधवारी ते पुन्हा लोकसभेत सादर करण्यात येणार आहे. यावर सखोल चर्चा झाल्यानंतर त्यावर मतदानही होणार आहे. हे लक्षात घेता भाजपाने आपल्या सर्व खासदारांना लोकसभेत उपस्थित राहण्यासाठी व्हिप बजावला आहे.
मशिदी काढून घेतल्या जातील, असे सांगून विरोधी पक्षाचे नेते मुस्लिमांना घाबरवत आहेत. पण जे लोक या विधेयकाला विरोध करत आहेत ते मुस्लिम नाहीत. ते काँग्रेस, समाजवादी पक्ष, आम आदमी पार्टी तसेच जनता दलातील राजकीय मुस्लिम आहेत. त्यांच्या मागे जमियत उलेमा-ए-हिंद आणि मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड यासारख्या स्वयंसेवी संस्था आणि समित्या आहेत. त्यांना मागच्या दाराने राज्यसभेत प्रवेश करायचा आहे, असा हल्लाबोल त्यांनी केला. हे सर्व वक्फचे लाभार्थी असून ते आपल्याकडून काढून घेतले जाईल, याची त्यांना काळजी आहे. पंतप्रधान मोदी वक्फ दुरुस्ती विधेयक मंजूर करतील आणि गरीब मुस्लिमांना त्यांचे हक्क देतील, याचा आम्हाला विश्वास आहे, असे ते म्हणाले.