Maharashtra Election Results 2024: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भाजप आणि शिवसेना (एकनाथ शिंदे गट), राष्ट्रवादी (अजित पवार गट) यांना मोठं यश मिळालं आहे. तर दुसरीकडे महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत अनेक दिग्गज नेत्यांचा पराभव झाला आहे. काँग्रेसचे बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या रोहिणी खडसे यांच्यासह अनेक ज्येष्ठ नेत्यांचा पराभव झाल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाले आहेत. महाविकास आघाडीचा दारुण पराभव झाला आहे. जनतेने महायुतीच्या पारड्यात मतांच भरभरुन दान टाकलं आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात भाजपा सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. त्याखालोखाल शिंदेंची शिवसेना आणि अजित पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे.
महाविकास आघाडीला स्पष्ट बहुमत मिळेल, असा दावा करणारे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांचाच पराभव झाला आहे. बाळासाहेब थोरात यांचा संगमनेर मतदारसंघातून पराभव झाला आहे. मुक्ताईनगरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या उमेदवार रोहिणी खडसे यांचा पराभव झाला आहे. कराड दक्षिण मतदारसंघातून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांचा पराभव झाला आहे. तर लातूर ग्रामीणमध्ये धीरज देशमुख यांचा पराभव झाला आहे. तिवसामधून काँग्रेसच्या यशोमती ठाकूर यांचा १० हजार मतांनी पराभव झाला आहे. हे निकाल अतिशय धक्कादायक असल्याची भावना काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या आहेत.
काँग्रेस, उद्धव ठाकरे गट आणि शरद पवार गट यांना विरोधी पक्ष नेतेपद मिळेल इतक्याही जागा जिंकता आलेल्या नाहीत. खरतर महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल चक्रावून टाकणारा आहे. महायुती सरकारने महिलांसाठी लाडकी बहिण योजना, ज्येष्ठांसाठी, युवकांसाठी स्टायपेड अशा वेगवेगळ्या योजना आणल्या. शेतकऱ्यांना वीज बिल माफी दिली, त्याचा मतदारांवर परिणाम झाल्याचा दिसत आहे.