मुंबई: आज अखेर मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्याचे स्वप्न पूर्ण झाले असून, याबाबतचा शासन आदेश जारी करण्यात आला आहे. केंद्रीय सांस्कृतिक मंत्री शेखावत यांच्याकडून शासन आदेशाची प्रत उदय सामंत यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला आहे.
“पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑक्टोबर महिन्यात मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा जाहीर केला होता. आज त्या पाश्वभूमीवर देशाचे सांस्कृतीक मंत्री गजेंद्र शेखावत यांची भेट घेतली. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याबाबतची अधिसुचना कधी मिळणार याबाबत विचारणा केली. यावेळी मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्याकरीता पाठपुरावा करणारी समिती उपस्थित होती. त्यानंतर काही वेळापूर्वीच केंद्रीय सांस्कृतीक मंत्री गजेंद्र शेखावत यांनी माझ्या हाती मराठी अभिजात भाषेचा दर्जा देण्यासंदर्भातील अधिसुचना असलेले पत्र दिले. त्यामुळे मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्याचे स्वप्न होतं, ते आज पूर्ण होत आहे”, असे उद्योग मंत्री उदय सामंत म्हणाले.
याशिवाय, मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्याबाबत अधिसुचना दिल्यानंतर आणखी मागणी मंत्री उदय सामंत यांच्याकडून केंद्रीय सांस्कृतीक मंत्री गजेंद्र शेखावत यांच्याकडे करण्यात आली आहे. त्यानुसार, “येत्या आठ ते 15 दिवसांत अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर ज्या काही बेनिफीट्स मिळतात, त्यासाठी आम्ही तातडीने प्रस्ताव सादर करु. तसेच, प्राकृत भाषेच्या संशोधनासाठी लागणाऱ्या निधीची मागणीही आम्ही केंद्रीय सांस्कृतीक मंत्र्यांकडे केली असून त्याला सकारात्मक प्रतिसाद त्यांनी दिला आहे”, असे उदय सामंत म्हणाले.