मुंबई: राज्यात विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होऊन दहा दिवस उलटून गेले आहेत. महायुतीला जनतेने संपूर्ण बहुमत दिले असेल तरी अद्याप सरकार स्थापन झालेले नाही. मुख्यमंत्री कोण होणार? हेच अजून स्पष्ट झालेले नाही. भाजपचा मुख्यमंत्री होणार असला तरी चेहरा कोण असणार हे अजूनही स्पष्ट नाही. दरम्यान आज विधानभवनात भाजपच्या गटनेत्याची निवड होणार आहे. त्याआधी भाजपच्या कोअर कमिटीची बैठक पार पडली
त्यानंतर केंद्रिय निरीक्षक विजय रूपाणी आणि निर्मला सीतारमण यांच्या नेतृत्वात कोअर कमिटीची बैठक पार पडली. कोअर कमिटीच्या बैठकीत गटनेतेपदी देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाला आहे. राज्याच्या मुख्यमंत्री देखील भाजपकडून देवेंद्र फडणवीस यांचे नाव लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे. भाजपचे सर्व 132 आमदार विधानभवनात उपस्थित आहेत. लवकरच सर्व आमदारांसमोर देवेंद्र फडणवीस यांच्या नावाचा प्रस्ताव गटनेतेपदासाठी मांडण्यात येणार आहे. सुधीर मूनगंटीवार आणि चंद्रकांत पाटील हे प्रस्ताव मांडणार आहेत. तर रवींद्र चव्हाण, आशीष शेलार हे प्रस्तावाला अनुमोदन देणार आहेत.