नाशिक - शेतकऱ्यांना पीक पाहणी नोंदणी मोबाईलवरुन करण्याची सुविधा शासनाने उपलब्ध करून दिली आहे. त्याअनुषंगाने अद्यापही ज्या शेतकऱ्यांनी पीक नोंदणी केली नाही. त्यांनी आपल्या मोबाईलच्या माध्यमातून 15 ऑक्टोबर, 2022 पर्यंत ई-पीक पाहणीसाठी नोंदणी करावी, असे जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांनी कळविले आहे.
शेतकऱ्यांसाठी असणाऱ्या योजनांचा लाभ घेण्यासाठी ई-पीक पाहणी नोंदणी करणे गरजेचे असून नोंदणी न केल्यामुळे विविध योजनांचा लाभ मिळण्यास अडचण होऊ शकते. त्यामुळे शेतकऱ्यांनी लवकरात लवकर ई-पीक पाहणीसाठी नोंदणी करणे आवश्यक आहे. यासाठी अद्यापही ज्या शेतकऱ्यांनी नोंदणी केलेली नाही त्यांनी आपल्या मोबाईलवरुन प्ले स्टोर मध्ये जाऊन ई पीक पाहणी व्हर्जन-2 ॲप डाऊनलोड करून आपल्या पिकाची नोंदणी करावी. ई-पीक नोंदणी करतांना अडचण आल्यास मंडळ अधिकारी व तलाठी यांच्याशी संपर्क करावा.
ई-पीक पाहणीच्या कामकाजाकरिता मंडळ अधिकारी, तलाठी, पोलीस पाटील व कोतवाल हे आपल्या कार्यक्षेत्रामध्ये उपस्थित राहून शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. तरी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी 7/12 ई- पीक पाहणीची नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांनी केले आहे.