पुणे: विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट तंत्रकौशल्य, विज्ञान व अभियांत्रिकी विद्याशाखांचे ज्ञान आणि नवकल्पना यांच्या आधारावर अवकाश संशोधन क्षेत्रातील असंख्य संधी हेराव्यात. अवकाश तंत्रज्ञानाचे विस्तीर्ण क्षेत्र आपलेसे करावे आणि अवकाश उद्योजक होण्याच्या दिशेने वाटचाल करावी असे आवाहन भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे (इस्रो) माजी अध्यक्ष डॉ. के. सिवन यांनी विद्यार्थ्यांना केले.
दिघी येथील आर्मी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नाॅलाॅजीच्या (एआयटी) ३१ व्या स्थापना दिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी 'एआयटी'तर्फे दिला जाणारा जीवनगौरव पुरस्कार डॉ. के. सिवन यांना भारतीय लष्कराच्या दक्षिण मुख्यालयाचे प्रमुख लेफ्टनंट जनरल धीरज सेठ यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. 'एआयटी'चे संचालक ब्रिगेडियर अभय भट, सहसंचालक एम. के. प्रसाद, प्राचार्य डॉ. बी. पी.पाटील, लष्करी अधिकारी, 'एआयटी'चे अनेक माजी विद्यार्थी, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
'द सक्सेसफुल यंग आंत्रप्रेन्युअर पुरस्कार' २००२ च्या तुकडीचे माजी विद्यार्थी प्रीतपालसिंग यांना देण्यात आला. ईशान कपूर यांना अष्टपैलू विद्यार्थी सन्मान देण्यात आला. सर्वोत्कृष्ट क्रीडापटूसाठीचा जी. राजशेखर स्मृती करंडक वंशिका या विद्यार्थिनीने पटकावला. सर्वोत्कृष्ट संशोधन व सल्लासेवा हा पुरस्कार डॉ. एल. डी. जठार यांना, तर सर्वोत्कृष्ट अध्यापक हा पुरस्कार डॉ. सीता यादव यांना देण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमांनी उपस्थितांची वाहवा मिळवली.
डॉ. के. सिवन यांनी इस्रोच्या वाटचालीचा आढावा घेत 'विद्यार्थ्यांनी अवकाश संशोधनाकडेही करिअर म्हणून बघावे', असा सल्ला दिला. "अवकाश तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात जगभर युवकांना अनेक संधी आहेत. संशोधनाला मोठा वाव आहे. या क्षेत्रात खासगीकरणाचे युग सुरू झाले आहे. केंद्र सरकारचा त्याला पाठिंबा आहे. विद्यार्थ्यांनी स्वतःच्या करिअरसोबत आपल्या देशाप्रती आणि आपल्या समाजाप्रती असलेली बांधीलकी ओळखून, या क्षेत्रात योगदान दिले पाहिजे. 'एआयटी'सारख्या संस्थेतील विद्यार्थ्यांकडून ही अपेक्षा अधिक आहे," असे ते म्हणाले.
सुरवातीला अंतराळयान हे इस्रोचे मुख्य कार्यक्षेत्र होते. पण आता चित्र बदलले आहे. या क्षेत्रातील खासगी क्षेत्राचा सहभाग व योगदान वाढते आहे. त्यामुळे विकासाच्या अनेकानेक शक्यता पुढे येत आहेत. राॅकेट आणि सॅटेलाईट निर्मितीच्या क्षेत्रात युवा अवकाश उद्योजक अतिशय मोलाची भूमिका निभावू शकतील. प्रसिद्ध शास्त्रज्ञ डॉ. विक्रम साराभाई यांच्या दृरदृष्टीमुळे भारत अवकाश क्षेत्रात गगनभरारी घेत आहे. समाजाच्या प्रत्येक घटकापर्यंत अवकाश तंत्रज्ञानाची उपलब्धता आणि विनियोग पोचण्याची आवश्यकता असल्याचेही त्यांनी नमूद केले.
लेफ्टनंट जनरल धीरज सेठ म्हणाले, "एआयटी ही लष्करी सेवांसह खासगी क्षेत्रालाही उत्कृष्ट तंत्रकुशल, अभियांत्रिकीतज्ञ देणारी पहिली व्यावसायिक शैक्षणिक संस्था आहे. गेल्या ३० वर्षांतील संस्थेचे योगदान महत्त्वपूर्ण आहे. संस्थेने केवळ अभियांत्रिकी शाखेचे विद्यार्थी घडवले असे नसून, आपल्या ज्ञानशाखेची विशिष्ट दृष्टी असणारे, सर्वोत्कृष्ट तंत्रकुशल आणि नवकल्पनांनी भारलेले विद्यार्थी घडवले आहेत. त्यांच्यात उत्कृष्ट उद्योजकीय वृत्ती निर्माण केली आहे. देशासाठी संस्थेने अनेक कर्तृत्ववान असे लष्करी अधिकारी दिले आहेत."
"विद्यार्थी हे देशाचे भविष्य घडवणारे उर्जास्रोत आहेत, देशाच्या प्रगतीची भविष्यातील पाने हेच युवक लिहिणार आहेत, हे जाणून संस्थेने अत्याधुनिक ज्ञानशाखांचा अंतर्भाव अभ्यासक्रमात केला आहे. राष्ट्र उभारणीत संस्थेचे विद्यार्थी, माजी विद्यार्थी, अध्यापक आणि प्रशासन, सारेच एकत्रित योगदान देत आहेत. विद्यार्थ्यांनी याची जाणीव ठेवून, संस्थेचे दूत म्हणून भावी काळात आपले कार्यक्षेत्र निवडले पाहिजे. आपल्या शिक्षणाचा, प्रशिक्षणाचा देशातील प्रत्येक घटकाला काय फायदा होईल, याचा विचार केला पाहिजे," असे सेठ यांनी सांगितले.
ब्रिगेडियर अभय भट यांनी स्वागत प्रास्ताविकात 'एआयटी'च्या गेल्या वर्सभरातील कामगिरीचा आढावा घेतला. तसेच भविष्यातील वाटचालीविषयी माहिती दिली. 'एआयटी'चे संचालक मेजर जनरल के. के. चक्रवर्ती यांनी आभार मानले. रोशनी गौडा आणि रजत सिंग यांनी सूत्रसंचालन केले.