शिर्डी: आंतरराष्ट्रीय तीर्थक्षेत्र असलेल्या श्री साईबाबांच्या शिर्डीत येणाऱ्या भाविकांची संख्या रोडावली आहे. देशातील इतर प्रमुख तीर्थस्थळांवर भाविकांची गर्दी दिवसेंदिवस वाढत जात आहे, परंतु शिर्डीत याउलट हीचं गर्दी कमी होतांना दिसत आहे. परिणामी शिर्डीतील अर्थकारण ठप्प झाले आहे.
शिर्डीतील कमी होणाऱ्या गर्दीच्या गंभीर प्रश्नावर व्यावसायिक, ग्रामस्थ आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी चिंतनपर बैठक घेतली आणि या बैठकीत गर्दी वाढविण्यासाठी काय उपाययोजना करता येतील? यावर चर्चा केली. या बैठकीत सुदर्शन न्यूज चॅनलचे संस्थापक अध्यक्ष डॉ. सुरेश चव्हाणके यांनी मार्गदर्शन केले.
ज्येष्ठ पत्रकार चव्हाणके यांच्या मतानुसार, साईबाबांविषयी चालू असलेल्या अपप्रचाराचा परिणाम शिर्डीच्या अर्थव्यवस्थेवर झाला आहे. शिर्डीला पर्यटन स्थळ म्हणून नव्हे, तर धार्मिक तीर्थस्थान म्हणून विकसित करण्याची गरज असल्याचे त्यांनी या बैठकीत नमूद केले. आगामी नाशिक कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर, शिर्डीत भाविकांना आकर्षित करण्यासाठी नियोजन करण्याची आवश्यकता असल्याचे बैठकीत ठरविण्यात आले आहे. तसेच साईबाबांबद्दल ते मुस्लिम असल्याचा अपप्रचार समाज माध्यमांवर करण्यात येतो. अशा अपप्रचारांना बंद करण्यासाठी व असा अपप्रचार करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात यावी यावरही चर्चा यावेळी झाली. पुढील २४ दिवसांत प्राथमिक आराखडा तयार करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. शिर्डीतील साईबाबा संस्थान, नगर परिषद, प्रशासन, ग्रामस्थ, राज्य आणि केंद्र सरकार, साईभक्त, तसेच देशभरातील साई मंदिरे यांनी एकत्र येऊन कार्य करणे गरजेचे आहे, असे बैठकीत ठरले.
यासाठी स्वतंत्र कार्यालय, वेबसाइट, घोषवाक्य, डिजिटल प्रचार मोहीम आणि वॉर रूम तयार करण्याची योजना आखली गेली आहे. डॉ. सुरेश चव्हाणके यांच्या ट्रस्टतर्फे या उपक्रमांसाठी २१ लाख रुपये देण्याचे जाहीर करण्यात आले आहे.
शिर्डीत रामनवमी, गुरुपौर्णिमा, कृष्णाजन्माष्ठमी व विजयादशमी हे महत्वाचे उत्सव असतात. या उत्सवाला देश - विदेशातून भाविक येत असतात, परंतु गेल्या एक वर्षांपासून या उत्सवासाठी येणारी भाविकांची संख्या कमी झाल्याने शिर्डीतील व्यावसायिक आर्थिक संकटात सापडले आहेत. शिर्डीत हॉटेल, लॉज, रेस्टॉरंट, फास्ट फूड, नॉवेल्टीज तसेच इतर छोटे - मोठे व्यवसाय हे येथील अर्थकरणाचा स्त्रोत आहे. हे सर्व व्यवसाय शिर्डीत येणाऱ्या भाविकांवर अवलंबून आहे. त्यामुळे साईभक्त हाच येथील अर्थकारणाचा केंद्राबिंदू आहे.
शिर्डीतील भाविकांच्या कमी होणाऱ्या गर्दीच्या या गंभीर प्रश्नावर शिर्डीत भाविकांची संख्या वाढवण्यासाठी संघटीत प्रयत्न, साईबाबांविषयी सकारात्मक प्रचार, उत्तम दळणवळण व्यवस्था आणि व्यावसायिक दृष्टिकोन आवश्यक आहे. शिर्डीला पुन्हा तीर्थक्षेत्र म्हणून भक्तीचा केंद्रबिंदू बनवण्यासाठी स्थानिक नागरिक, प्रशासन आणि धार्मिक संस्थांना एकत्र येण्याची गरज आहे.