पन्हाळा: पर्यटकांनी पन्हाळागडावरील पुसाटी बुरुजाजवळील तटबंदीचे दगड दरीत टाकून दिले आहेत. तटबंदीचे मोठे दगड दरीत खाली ढकलणे सोपे नाही, तरीही असे कृत्य पर्यटकांनी केले आहे. पुसाटी बुरुजाजवळ पोलिसांच्या दोन चौक्या असतांनाही हा प्रकार घडला आहे.
तटबंदी तुटल्याचे सकाळी पन्हाळागडावर फिरायला येणार्या स्थानिक लोकांच्या निदर्शनास आल्यावर त्यांनी पुरातत्व विभागाचे विभागीय अधिकारी विजय चव्हाण यांना हे कळवले. त्यावर चव्हाण म्हणाले की, या प्रकाराविषयी आम्ही अनभिज्ञ आहोत. तटबंदीचे खाली पडलेले दगड वर आणून दुरुस्ती करून घेत आहोत. ‘छत्रपती शिवाजी महाराजांच्या गडाची नासधूस करणार्या पर्यटकांनी पन्हाळागडावर येऊ नये’, असे आवाहनही त्यांनी केले असून स्थानिक लोकांनी लक्ष दिल्यामुळे गड सुस्थितीत आहे, असे मतही व्यक्त केले. या प्रकाराकडे पुरातत्व विभाग आणि पोलीस प्रशासन या दोघांचेही अक्षम्य दुर्लक्ष झालेले आहे, असे मत स्थानिक नागरिकांनी व्यक्त केले आहे.