पुणे: पिंपरी - चिंचवडमध्ये बेकायदेशीरपणे विक्री करण्यात येणाऱ्या सौंदर्यप्रसाधनाचा मोठासाठा जप्त करण्यात आला होता. हे सौंदर्यप्रसाधन पाकिस्तानच्या लाहोर येथून आयात करण्यात आला असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवळ यांनी दिली.
खडकवासला मतदार संघाचे आमदार भीमराव तापकीर यांनी विधीमंंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात जप्त केलेल्या सौदर्यप्रसाधनाविषयी प्रश्न उपस्थित केला. त्याला उत्तर देताना मंत्री झिरवळ यांनी हा साठा पाकिस्तानमधून आल्याचे स्पष्ट केले.
मुंबई येथे सुरु असलेल्या विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आमदार भीमराव तापकीर यांनी धायरी आणि पिंपरी चिंचवड येथे जप्त केलेल्या सौंदर्यप्रसाधनाविषयी प्रश्न उपस्थितीत केला. त्यावरून ही गंभीर माहिती समोर आली.
आमदार तापकीर म्हणाले की, धायरीमध्ये २० लाख ७२ हजार ४८७ किमतीचा साठा प्रतिबंध करण्यात आला होता. हा साठा कर्नाटक, तेलंगनातून आला होता. मात्र हा साठा येथे आला कसा?, तो साठा येथे आणताना पुण्याच्या अन्न व औषध प्रशासनाची परवानगी घेतली होती का ? याशिवाय आगस्ट २०२४ मध्ये पिंपरी चिंचवडमध्ये आयात केलेला सौंदर्यप्रसाधनाचा साठाही जप्त केला होता. मात्र तो जप्त केलेला साठा कोणत्या देशातून आला? तो कोणत्या नावाने विक्रीसाठी उपलब्ध आहे याची माहिती अद्याप मिळालेली नाही. सध्या राज्यभरामध्ये सौंदर्यप्रसाधन लॅबची संख्या किती आहे?, पुणे जिल्ह्यात सौंदर्य प्रसाधन उत्पादक व क्लिनीकची संख्या किती आहे? आणि गैरमार्गाने काम करणाऱ्यांवर अन्न औषध प्रशासनाने किती कारवाई केली? असे गंभीर प्रश्न विचारत सभागृहाचे लक्ष वेधले.
याला उत्तर देताना मंत्री झिरवळ म्हणाले की, पिंपरी चिंचवडमध्ये प्रतिबंधीत केलेला साठ्याचा विषय अतिशय गंभीर आहे. कारण हा साठा पाकिस्तानातील लाहोर मधून आला होता. होरीक केमेस्ट्री या कंपनीने तो तयार केला आहे. विशेष म्हणजे विक्रेत्यांकडे आयात - निर्यातीचे परवाने नाहीत. त्यामुळे तो साठा आला कसा याची तपासणी सुरू आहे. त्यामुळे अधिवेशन संपण्यापूर्वी त्यांच्यावर खटला दाखल करण्यात येईल अशी ग्वाहीही झिरवळ यांंनी आमदार तापकीर यांना दिली. दुसरीकडे धायरी येथे प्रतिबंधीत केलेला साठ्याबाबत कारवाई बाबत ते म्हणाले की, धायरीत सापडलेल्या विक्रेत्यांकडे सौंदर्य प्रसाधाने विक्रिची परवानगी आहे. मात्र कर्नाटक आणि तेलंगणा येथील सौंदर्यप्रसाधानाबाबत परवानगी नव्हती त्यामुळे त्या उत्पादनांना प्रतिबंध करण्यात आला.
सामान्य नागरिक त्वचेच्या आरोग्यसाठीबाजारातून सौंदर्य प्रसाधन घेतात मात्र त्यांची फसवणूक होण्याची शक्यता आहे. हे सौंदर्यप्रसाधनांची तपासणी केली गेली कीनाही याची माहिती नसते. महाराष्ट्रात असे लॅब आहेत का? असतील तर किती आहेत, पुण्यात असे किती उत्पदाक आहेत ? ते जर अशी गैरमार्गाने काम करत असतील तर त्यांच्यावर आतापर्यंत किती कारवाई झाल्या आदी प्रश्नही आमदार तापकीर यांनी विचारले. त्यावेळी कारवाई बाबातमंत्री झिरवळ यांना उत्तर देता आले नसले तरी पिंपरी चिंचवडमध्ये सापडलेल्या विक्रेत्यांवरअधिवेशन संपायच्या आत कारवाई करु असे त्यांनी सांगितले.