नागपूर: मागील काही दिवसांपासून औरंगजेबाची कबर हटवण्यावरुन राज्यात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. या मागणीसाठी राज्यातील अनेक हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर नागपूरमध्ये काल सोमवारी दि. १७ मार्च रोजी दोन गटात हिंसक हाणामारी झाली आहे. सायंकाळी नागपुरातील महाल परिसरात औरंगजेबाच्या कबरीवरुन हे दोन्ही गट समोरासमोर आले. काही वेळातच दोन्ही गटांमध्ये दगडफेक आणि जाळपोळ सुरू झाली. या घटनेत अनेक पोलिसही जखमी झाले आहेत. दरम्यान, या घटनेनंतर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शांततेचे आवाहन केले आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, की नागपूरच्या महाल परिसरात दगडफेक आणि तणावपूर्ण परिस्थितीनंतर पोलिस प्रशासन परिस्थिती हाताळत आहे. या परिस्थितीत नागरिकांनी प्रशासनाला पूर्ण सहकार्य करावे, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. तसेच, नागपूर हे शांतताप्रिय आणि सहकार्यशील शहर आहे. ही नागपूरची परंपरा आहे. अशा परिस्थितीत कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका आणि प्रशासनाला पूर्ण सहकार्य करा, असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.