अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात दररोज नवनवे आरोप होताना दिसत आहे. सुशांतच्या वडिलांनी अभिनेत्री रिया चक्रवर्तीवर गंभीर आरोप केल्यानंतर हे प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आलं. त्यामुळे सुशांतच्या मृत्यूची सीबीआय चौकशी करण्याची मागणीही होऊ लागली आहे. दरम्यान, बिहारचे उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी यांनी या प्रकरणात मुंबई पोलिसांवर गंभीर आरोप केला आहे.
अभिनेता सुशांत सिंहच्या आत्महत्येनंतर या प्रकरणाचा तपास मुंबई पोलीस करत आहेत. तपास सुरू असतानाच सुशांतचे वडील के.के. सिंह यांनी रिया चक्रवर्तीवर आरोप केले होते. सुशांतला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचंही त्यांनी तक्रारीत म्हटलं होतं. या प्रकरणी पाटणा पोलिसांत गुन्हा दाखल झाला असून, बिहार पोलीस सध्या मुंबईत आहेत. दरम्यान, बिहारचे उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी यांनी या प्रकरणी एक ट्विट केलं असून, त्यात मुंबई पोलिसांवर आरोप केला आहे.
“सुशांतच्या मृत्यू प्रकरणाची बिहार पोलिसांकडून चौकशी केली जात असून, मुंबई पोलिसांकडून निष्पक्ष चौकशीत अडथळा आणला जात आहे. त्यामुळे सीबीआयनं हे प्रकरण स्वतःकडे घ्यावं, असं भाजपाला वाटतं,” असं सुशील कुमार मोदी यांनी म्हटलं आहे.
सुशांतच्या आत्महत्या प्रकरणात तीन ठिकाणाहून तपास
सुशांतच्या आत्महत्येचा तीन यंत्रणा तपात करत आहेत. आत्महत्येनंतर मुंबई पोलिसांनी तपास सुरू केला होता. त्यानंतर सुशांतच्या वडिलांनी पाटणात रिया चक्रवर्ती विरोधात फिर्याद दिल्यानंतर गुन्हा दाखल झाला. त्यामुळे बिहार पोलिसांनीही या प्रकरणात चौकशी सुरू केली आहे. त्याचबरोबर सुशांतच्या वडिलांनी १५ कोटी रुपये उकळल्याचा आरोप रियावर केल्यानं ईडीनं आर्थिक गैरव्यवहाराच्या अंगानं या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे.