ठाणे: पत्नीसोबत अनैतिक संबंधातून पश्चिम बंगालमध्ये दोन तरूणांनी एकाची गोळ्या झाडून हत्या केली. एक पकडला गेला, मात्र दुसरा पसार झाला होता. हा फरार शूटर मजुराचा बुरखा पांघरून डोंबिवलीत वास्तव्य करत होता. मानपाडा पोलिसांनी या आरोपीला जेरबंद करून पश्चिम बंगाल पोलिसांच्या स्वाधीन केले आहे. जिहादी सिराज शहा उर्फ कॅप्टन असे अटक करण्यात आलेल्या शूटरचे नाव असून तो डोंबिवली एमआयडीसीमध्ये मजूर म्हणून काम करत होता. महाराष्ट्र पोलिसांनी सापळा रचून या आरोपीला पकडून बंगाल पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.
पश्चिम बंगाल मधील हुगळी येथील डंकुनी पोलिस ठाण्याच्या हद्दीत फेब्रुवारी महिन्यात बंटी साव या व्यक्तीची गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. या हत्येतील मुख्य आरोपी अनिल साव याला पोलिसांनी तातडीने अटक केली होती. मात्र या हत्येत सहभागी असलेला दुसरा आरोपी जिहादी सिराज शहा हा पसार होण्यास यशस्वी झाला होता. पोलिस त्याचा शोध घेत होते. त्यांचा शोध डोंबिवलीत संपला होता. त्यांना तो डोंबिवलीत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर या प्रकरणाचा शोध करत असलेल्या बंगाल येथील डंकुनी पोलिसांनी मानपाडा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक विजय कादबाने यांना याची माहिती दिली.
दरम्यान, कल्याणचे डीसीपी अतुल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली आरोपीला शोधण्याचे काम करण्यात आले. मानपाडा पोलिसांनी आरोपीचा शोध घेतला. अखेर मानपाडा पोलिस ठाण्यातील पोलिस अधिकारी महेश राळेभात यांच्या पथकाला एक माहिती मिळाली. त्यानुसार आरोपी हा डोंबिवलीत असल्याचे समजले. डोंबिवली एमआयडीसीत हा संशयीत आरोपी मजूर म्हणून काम करत होता. गेल्या दोन तिन महिन्याापासून तो काम करत असल्याचे समोर आले. शिवाय तो पश्चिम बंगालचा असल्याचं ही पोलिसांना समजलं होतं. लगेचच पोलिसानी त्या मजूराला ताब्यात घेतले. तो मजूर दुसरा कोणी नसून हत्येच्या गुन्ह्यातील आरोपी जिहादी सिराज शहा हाच होता. त्याला अटक करून पश्चिम बंगाल पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.