मुंबई: जम्मू - काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात पर्यटकांना लक्ष्य करुन आणि धर्म विचारुन गोळीबार करण्यात आला. यामध्ये २७ पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. यावरुन संपूर्ण देशभरातून रोष व्यक्त केला जात आहे. या हल्ल्याबाबत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे. तसेच जगात एकच धर्म आहे तो म्हणजे मानवधर्म आणि हिंदू धर्म हाच मानवधर्म असल्याचे देखील मोहन भागवत म्हणाले आहेत. विलेपार्ल येथे आयोजित एका कार्यक्रमामध्ये सरसंघचालक मोहन भागवत हे भाषण करत होते.
यावेळी बोलतांना मोहन भागवत म्हणाले, की जगात एकच धर्म आहे तो म्हणजे मानव धर्म. त्यालाच हिंदू धर्म म्हणतात. आपल्या जवानांनी किंवा आपल्याकडच्या लोकांनी कधी कुणाला धर्म विचारून लोकांना मारलेले नाही. काल कट्टरपंथीयांनी जो उत्पात केला, तसा हिंदू कधीही करणार नाही. पण आपल्या संप्रदायाचा चुकीचा अर्थ लावणारे कट्टरपंथी असं करतील. त्यामुळेच आपला देश बलवान पाहिजे”, अशी भूमिका मोहन भागवत यांनी व्यक्त केली आहे.
तसेच पुढे ते म्हणाले, की आपल्या मनात दुःख आहे. सगळ्यांची अंतःकरण जड झाली आहेत. या सर्व कुटुंबीयांच्या दुःखात आपण सहभागी आहोत. पण आमच्या मनात क्रोधही आहे. तो असला पाहिजे. असुरांचं निर्दालन व्हायचं असेल, तर अष्टादश भुजांची शक्ती असलीच पाहिजे. चांगलेपणा दुरुस्त करण्याचे सृष्टीचे जे मार्ग आहेत, त्यात एक मार्ग समजावून देण्याचा असतो. अनुभवातून मनुष्य शिकतो आणि सुधारतो. काही लोक असे असतात जे सुधरतच नाही. जे शरीर, मन त्यांनी धारण केलंय, त्यात परिवर्तन शक्य नसतं,” असे मत मोहन भागवत यांनी व्यक्त केले. तसेच आक्रमक भूमिका घेतली आहे.