मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आले आहेत. पंतप्रधान मोदींनी नौदलाच्या आयएनएस सुरत, आयएनएस नीलगिरी या युद्धनौका आणि आयएनएस वाघशीर पाणबुडीचं राष्ट्रार्पण केलं आहे. संपूर्ण जग हे कुटुंब आहे, असा आमचा विश्वास आहे. आम्ही 'सबका साथ सबका विश्वास' या भावनेवर विश्वास ठेवतो. त्यामुळेच आम्ही या प्रदेशाच्या सुरक्षेला प्राधान्य देतो. जागतिक सुरक्षा, अर्थशास्त्र आणि भू - राजकारणाच्या बाबतीत 'सागरी राष्ट्र' म्हणून भारताचं मोठं योगदान असेल, असं यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, " पहिल्यांदाच एक विनाशिका, फ्रिगेट आणि पाणबुडी एकत्रितपणे भारतीय नौदलात कमिशन केली जात आहे. भारताला जगात विश्वसनीय आणि जबाबदार देश म्हणून ओळखलं जात आहे. भारत विस्तारवादापेक्षा विकासाच्या भावनेवर काम करतो. भारतानं जगाला 'सागर' चा मंत्र दिला. त्याचा अर्थ या प्रदेशातील सर्वांची सुरक्षा आणि सर्वांचा विकास आहे. आयएनएस नीलगिरी चोलांच्या सागरी क्षमतेच्या बळावर समर्पित आहे. भारत विस्तारवादापेक्षा आदर्शवादाच्या विचारसरणीवर काम करतो. भारतानं नेहमीच इंडो-पॅसिफिक प्रदेशाला खुल्या, सुरक्षित, समावेशक आणि समृद्धीसाठी पाठिंबा दिला."
पुढे पंतप्रधान म्हणाले, " भारत संपूर्ण हिंद महासागर क्षेत्रात प्रथम प्रतिसाद देणारा देश म्हणून उदयास आला आहे. गेल्या काही महिन्यांत नौदलानं शेकडो लोकांचे जीव वाचवले आहेत. तसेच हजारो कोटी रुपयांच्या राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय मालवाहतुकीचे संरक्षण केलं आहे. यामुळे संपूर्ण जगाचा भारतावरील, भारतीय नौदल आणि तटरक्षक दलावरील विश्वास सतत वाढत आहे. भारताचे सर्वांसोबतचे आर्थिक सहकार्य अधिक मजबूत होत आहे. १५ जानेवारी हा दिवस सैन्य दिन म्हणूनही साजरा केला जातो. देशाच्या सुरक्षेसाठी आपले जीवन समर्पित करणाऱ्या सर्व शूरांना मी वंदन करतो. छत्रपती शिवाजी महाराजांनी भारतीय नौदलाला नवीन दृष्टिकोन आणि सामर्थ्य दिलं. आज, आपण २१ व्या शतकातील नौदलाला त्यांच्या पवित्र भूमीवरून बळकट करण्यासाठी एक मोठे पाऊल उचलत आहोत."