छत्रपती संभाजीनगर: मिशन अयोध्या चित्रपटाचे लॉन्च २४ जानेवारी २०२५ रोजी एकाच वेळी महाराष्ट्रात होणार आहे. आज छत्रपती संभाजीनगरमध्ये ट्रेलर लॉन्चिंगचा कार्यक्रम पार पडला. यावेळी रामगिरी महाराज यांनी उपस्थिती लावली होती. याप्रसंगी रामगिरी महाराज यांनी मनोगत व्यक्त केलं. त्यावेळी त्यांनी हे वक्तव्य केलं आहे. जन - गण - मन नाही, तर वंदे मातरम् हेचं आपलं राष्ट्रगीत, भविष्यात वंदे मातरम हे राष्ट्रगीत व्हावे यासाठीही आपण संघर्ष करू शकतो, असं वक्तव्य रामगिरी महाराज यांनी केलं आहे.
रामगिरी महाराजांनी राष्ट्रगीतासोबतच महान कवी रवींद्रनाथ टागोर यांच्याबद्दल ही वक्तव्य केले. ते म्हणाले की, आपण राष्ट्रगीत ऐकतो, आपल्या राष्ट्रगीताचा इतिहास किती लोकांना माहित आहे? हे मला माहीत नाही, पण आज मी सत्य सांगणार आहे. कदाचित तुम्हा लोकांना याची माहिती नसेल. रवींद्रनाथ टागोरांनी हे गाणे १९११ मध्ये कलकत्ता येथे गायले होते, जेव्हा भारत स्वतंत्र देश नव्हता. रवींद्रनाथ टागोरांनी पंचम जॉर्ज यांच्या समर्थनार्थ हे गाणे गायले होते. जॉर्ज पंचम कोण होता? तो ब्रिटिश राजा होता आणि तो भारतीयांवर अत्याचार करत होता. राष्ट्रगीत हे भारतातील लोकांसाठी नाही. त्यामुळे भविष्यात यासाठीही संघर्ष करावा लागणार आहे. ते पुढे म्हणाले, की वंदे मातरम हे आपले राष्ट्रगीत असले पाहिजे, असं वक्तव्य प. पू. रामगिरी महाराज यांनी केलं आहे.