बिहारचे सिंघम म्हणून ओळख असलेले मूळचे महाराष्ट्रातील आयपीएस अधिकारी शिवदीप लांडे यांनी पोलीस सेवेतून राजीनामा दिला आहे. शिवदीप लांडे यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत याबाबत माहिती दिली आहे.
शिवदीप लांडे यांनी म्हटले आहे की, माझ्या प्रिय बिहार, गेली 18 वर्षे सरकारी पदाच्या माध्यमातून सेवा केल्यानंतर मी आता माझ्या पदाचा राजीनामा देत आहे. माझ्या या सगळ्या कार्यकाळात मी बिहार राज्याला स्वत:पेक्षा आणि कुटुंबापेक्षा सर्वोच्च मानले आहे. माझ्या सेवेच्या काळात माझ्याकडून कोणतीची चुकभूल झाली असेल तर मी त्यासाठी क्षमस्व आहे. मी भारतीय पोलीस सेवेतून राजीनामा दिला आहे. मात्र, मी बिहारमध्येच राहणार आहे. यापुढेही बिहार हीच माझी कर्मभूमी असेल, असे शिवदीप लांडे यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये नमूद केले आहे.
लांडे हे शिंदे गटाचे नेते माजी मंत्री विजय शिवतारे यांचे जावई आहेत. त्यांनी मुंबईत अमली पदार्थ विरोधी पथकात कार्यरत असतानाही प्रभावी कामगिरी करत ड्रग्ज तस्करांचे कंबरडे मोडले होते. तर गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त असताना अनेक महत्वाचे गुन्हे उघडकीस आणले होते. शिवदीप यांनी बिहारमध्ये अनेक धडक कारवाया करून गुन्हेगारी संपुष्टात आणली. धडक कारवाई रोखण्यासाठी त्यांच्यावर राजकीय दबाव टाकण्यात आला. त्यांची बदलीही करण्यात आली. मात्र, शिवदीप यांच्या बदलीविरोधात बिहारी जनता रस्त्यावर उतरली होती. लांडे आता प्रशांत किशोर यांच्या पक्षात सामील होणार असल्याची चर्चा आहे.