पाथर्डी: जवखेडे खालसा येथील कानोबा उपाख्य कानिफनाथ देवस्थानाच्या इनामी जागेत शेख गणीभाई, शेख अब्बास सरदार बाबा आणि शेख जमादार यांनी अनधिकृत हॉटेल सावन उभारले आहे. तसेच आता त्या भागात अनधिकृत बांधकाम चालू केले आहे. १४ जानेवारी या दिवशी स्थानिक अमोल वाघ आणि ग्रामस्थ यांनी महसूल, पोलीस आणि ग्रामपंचायत प्रशासनास निवेदन देऊन बांधकाम हटवण्याची मागणी केली होती; परंतु प्रशासनाने कोणतीही कारवाई केली नसल्यामुळे ग्रामस्थांनी ४ मार्चपासून तहसील कार्यालय, पाथर्डी येथे आमरण उपोषण चालू केले आहे.
उपोषणाच्या तिसर्या दिवशी, म्हणजेच ६ मार्चला तहसीलदारांनी याची नोंद घेत स्थानिक सरपंच आणि ग्रामपंचायत अधिकार्यांना अनधिकृत बांधकाम करणार्यांना नोटीस काढण्याचे आदेश दिले. ग्रामपंचायतीच्या नोटिसीनुसार संबंधितांनी ३० दिवसांत लेखी खुलासा द्यावा किंवा स्वतःहून बांधकाम हटवावे, अन्यथा कायदेशीर कारवाई केली जाईल, असे स्पष्ट करण्यात आले. प्रशासनाच्या लेखी आश्वासनानंतर ग्रामस्थांनी उपोषण मागे घेतले.