नंदुरबार: मौजे मोठे कडवान, नवापूर, जिल्हा नंदुरबार येथे किसन पाच्या वळवी यांनी इव्हेंजेलीकल अलायन्स ख्रिश्चन चर्च ट्रस्ट चिंचपाडा कौन्सिलच्या अंतर्गत होणार्या संयुक्त संजीवनी सभेस विरोध केल्यामुळे जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने ख्रिस्त्यांनी त्यांच्यावर आक्रमण करून मारहाण केली. या प्रकरणी संबंधित लोक आणि त्यांना प्रोत्साहन देऊन सहकार्य करणारे अधिकारी अन् कर्मचारी यांच्यावर कारवाई करण्याची मागणी विश्व हिंदू परिषदेने जिल्हाधिकार्यांना निवेदनाद्वारे दिली आहे.
विश्व हिंदू परिषदेने निवेदनात म्हटले आहे, की मारहाणीत किसन पाच्या वळवी गंभीररित्या घायाळ झाले. आक्रमणकर्त्यांवर कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. उलट किसन यांच्यावर पोलिसांनी कुठलीही चौकशी न करता खोटा गुन्हा नोंदवून अन्याय केला आहे. किसन हे सरकारी दवाखान्यात उपचार घेत असतांना त्यांचे कुटुंबीय उपस्थित नसतांना जबाब नोंदवून जिल्हाधिकार्यांना परस्पर निवेदन दिले. जो अधिकारी घायाळ झालेल्या किसन यांच्यावर नोंदवलेल्या गुन्ह्याचे अन्वेषण करत होता, तोच त्यांचा जबाब नोंदवण्यासाठी का आला? त्याला किसन वळवी जी आदिवासी भाषा बोलतात, ती येत होती का? किसनच्या सांगण्यावरून जबाब नोंदवला? की पोलीस अधिकार्यांनी आरोपींना वाचवण्यासाठी आरोपीच्या सोयीचा जबाब सिद्ध केला? असे अनेक प्रश्न पोलीस प्रशासनाच्या कामावर संशय निर्माण करतात, म्हणून या प्रकरणी गृहमंत्रालयाच्या माध्यमातून चौकशी झाली पाहिजे.
तसेच किसन यांनी वेळोवेळी गावातील अवैध चर्च बांधकामे आणि अवैध कार्यक्रम यांविषयी पोलीस अन् प्रशासन यांच्याकडे तक्रारी दिलेल्या होत्या; पण पोलीस प्रशासन आणि महसूल विभाग यांनी कोणतीच कारवाई केली नाही; म्हणून याचा अपलाभ घेत किसन यांच्यावर आक्रमण करण्यात आले. या प्रकरणी पोलीस प्रशासन आणि महसूल विभागाचे अधिकारी यांची चौकशी होऊन कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी निलंबनाची कार्यवाही करण्यात यावी. प्राणघातक आक्रमण करणार्या ख्रिस्ती समर्थकांना तात्काळ अटक करावी.
या मागण्या मान्य न झाल्यास पोलीस आणि महसूल विभाग, तसेच आरोग्य विभाग यांच्याविरुद्ध लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येईल. या प्रकरणी फुलीबाई किशन वळवी, सर्वश्री श्याम नारायण गावित, गोपाल किसन बुनकर, धोंडीराम महादेव शिनकर, विरेंद्र वळवी यांनी प्रशासनाला निवेदन दिले.