नाशिक: देशातील शेतकर्यांच्या सक्षमीकरणासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत. या उपक्रमांच्या माध्यमातून सक्षमीकरण होईल, असे प्रतिपादन केंद्रीय कृषी, शेतकरी कल्याण, ग्रामीण विकासमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी केले. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने काल सकाळी किसान सुसंवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी बोलतांना ते म्हणाले, की शेतकरी भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा आहे. प्रत्येक शेतकर्यामध्ये आपण देव पाहतो. शेतकर्यांची सेवा ही ईश्वर सेवा आहे. शेतकर्यांच्या हितासाठी शासनाकडून अनेकविध योजना व उपक्रम राबवण्यात येत आहेत. याचाच एक भाग म्हणून पीकविमा योजनेचा लाभ तत्काळ मिळण्यासाठी गाव व पंचायत स्तरावर उपग्रह प्रणालीद्वारे झालेल्या पीक नुकसानीचे पंचनामे केले जाणार आहेत. त्यामुळे अचूक प्रक्रिया होऊन शेतकर्यांना देय भरपाई डी.बी.टी.द्वारे त्वरित प्रदान केली जाईल.
शेतकर्यांना पिकांचे उत्पादन घेण्यासाठी लागणारी खते ही स्वस्त दरात उपलब्ध करण्यात येत आहेत. यासोबतच शेतकर्यांच्या उत्पादित निर्यातक्षम मालाला योग्य मोबदला व बाजारपेठ मिळण्याच्या दृष्टीने शासन सकारात्मक आहे. नाशिक जिल्ह्यात द्राक्ष उत्पादक शेतकरी जास्त आहेत. शेतकर्यांना परदेशी द्राक्षांची नवनवीन वाणांची उपलब्धता कशी करता येईल, यासाठी बैठकीचे आयोजन करून सकारात्मक निर्णय घेतला जाईल, असेही केंद्रीय कृषिमंत्री चौहान यांनी यावेळी सांगितले.