पुणे: ससून रुग्णालयातील कर्मचार्यांनी संगनमताने ४ कोटी रुपयांचा आर्थिक अपव्यवहार केल्याचे उघडकीस आले आहे. रुग्णालयाचे प्रशासकीय अधिकारी गोरोबा आवटे यांनी या प्रकरणी बंडगार्डन पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार तत्कालीन लेखापाल अनिल माने, रोखपाल सुलक्षणा चाबुकस्वार यांच्यासह ससूनच्या आणि काही खासगी अशा २३ कर्मचार्यांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
वैद्यकीय शिक्षण विभागासह बी.जे. वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता यांची अनुमती नसतांना प्रशासकीय अधिकार्यांच्या स्वाक्षरीने रुग्णालयातील १६ कर्मचारी आणि अन्य ८ खातेदार यांच्या खात्यातून ४ कोटी १८ लाख ६२ सहस्र ९४२ रुपयांचे वितरण स्वत:च्या आणि अन्य खातेदारांच्या खात्यामध्ये केल्याचे उघडकीस आले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आर्थिक अपव्यवहारामध्ये लेखापाल माने यांच्यासह रुग्णालयातील वरिष्ठ लिपिक, लिपिक, परिचारिका, तंत्रज्ञ यांच्यासह काही खासगी व्यक्तींचा सहभाग आहे. हा प्रकार ३१ जुलै २०२३ ते २४ जानेवारी २०२४ या कालावधीत घडला आहे.