लातूर: लातूर जिल्ह्यातल्या चाकूर तालुक्यातील रोहिणी शिवारात पोलिसांनी धाड टाकली. तिथे त्यांना माळरानावर पत्र्याचं शेड ते ही गंजलेलं आढळून आलं. आत कांद्याची चाळ, एखादा फॅन, एखादी खुर्ची, अस्ताव्यस्त पसरलेलं सामान आणि काही तरी केमिकल एक्स्पिरिमेन्ट करणारं पात्र दिसून आले. हा सगळा सेटअप ड्रग्जचा कारखाण्याचा होता! तिथं तब्बल १७ कोटींचं ड्रग्ज जप्त केलं आहे. शिवाय पाच जणांना अटक केली आहे. सर्वात धक्कादायक गोष्ट म्हणजे या कारखान्याचा म्होरक्या असलेला प्रमोद केंद्रे हा मुंबई पोलिसांचा कर्मचारी आहे!
प्रमोद केंद्रे हा मुंबई पोलीस दलात कार्यरत होता. त्यावेळी त्याची मुंबईतील एका ड्रग्ज तस्कराशी ओळख झाली. ड्रग्ज तस्कराने प्रमोद केंद्रेला ड्रग्ज तयार करण्याचं प्रशिक्षण दिलं होतं. यातून अमाप पैसा मिळेल हे प्रमोद केंद्रेलाही समजलं होतं. त्यामुळे काही महिन्यांपूर्वी प्रमोद केंद्रेनं आपल्या गावाकडे माळरानावर शेड मारलं. शेडमध्ये ड्रग्ज निर्मितीची उपकरणे बसवली. त्यानंतर त्यातून ड्रग्ज निर्मिती सुरु केल्याचा आरोप त्याच्यावर आहे. ड्रग्ज निर्मिती सुरु होती. त्यातून बक्कळ पैसा मिळत होता. पण काही दिवसांपूर्वी पुणे पोलिसांनी एका ड्रग्ज पेडलरला अटक केली. त्याच ड्रग पेडलरला दांडक्याचा प्रसाद दिल्यानंतर, त्याने प्रमोद केंद्रेच्या ड्रग्जच्या कारखान्याचा पत्ता सांगितला.
दयम्यान, पोलिसांनी पाळत ठेवली. आणि अखेर प्रमोद केंद्रेला बेड्या पडल्या. प्रमोद केंद्रे सह जिहादी जुबेद हसन मातकर, मोहम्मद असलम खान, अहमद कलीम शेख आणि खाजा शफिक मोमीन यांनाही अटक केली आहे. अटक केलेल्यांना घेऊन पोलिस कारमधून लातूरच्या दिशेने ते निघाले होते. लातूर रोड येथील एका हॉटेल जवळ आल्यानंतर कारमध्ये पाठीमागे बसलेल्या संशयित आरोपीने अचानक चालकाला मारहाण करण्यास सुरवात केली. कारचे स्टेअरिंग वळवून पळून जाण्याचा प्रयत्न केला. तेव्हा कारमधील पथक प्रमुखांच्या प्रसंगावधानामुळे त्यास पळून जाता आले नाही. मात्र,भरधाव वेगातील कारने एका दुचाकीला धडक दिली.