सातारा: छत्रपती शिवाजी महाराज आणि लहानग्या शंभूराजे यांना औरंगजेब आगर्याच्या कैदेतून रोखू शकला नाही. आज ३५० वर्षांहून अधिक काळ लोटला, तरी छत्रपती शिवराय आणि छत्रपती संभाजी महाराज यांचा ‘भीम पराक्रम’ सर्वज्ञात आहे. छत्रपतींविषयीचे प्रेम प्रत्येकाच्या नसानसांत भिनले आहे. औरंगजेब छत्रपतींना रोखू शकला नाही; मग छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा उभारण्यापासून रोखणारे तुम्ही कोण? असा परखड प्रश्न सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी कर्नाटक सरकारला विचारला आहे. बेळगाव जिल्ह्यातीलअनगोळ येथील धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या अनावरणप्रसंगी ते बोलत होते. कर्नाटक सरकारने पुतळा उभारण्याला आडकाठी आणली होती.
शिवेंद्रसिंहराजे भोसले पुढे म्हणाले, की ‘‘छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज ही दैवी शक्ती होती. त्यामुळेच आजही अनेकांना पुन्हा हिंदवी स्वराज्य स्थापन व्हावे, असे वाटते. कर्नाटकच्या प्रशासनालाही हीच अपेक्षा असावी. छत्रपती शिवाजी महाराज केवळ मराठ्यांचे नव्हते, तर ते अठरापगड जातींचे होते. सर्वांना सोबत घेऊन त्यांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली.’’