पुणे: मला कराडचा एन्काऊंटर करण्याची ऑफर होती, असा दावा करणारे बीडचे निलंबित पोलीस अधिकारी रणजीत कासले हे मागच्या काही दिवसांपासून चर्चेत आहेत. सोशल मीडियावर ते व्हिडीओ टाकून गंभीर आरोप करत होते. रणजीत कासले बीडच्या सायबर विभागात पोलीस उपनिरीक्षक म्हणून कार्यरत होते. सायबर विभागात दाखल झालेल्या गुन्ह्याच्या तपासासाठी ते परवानगीशिवाय परराज्यात गेले होते. परराज्यात त्यांनी आरोपींकडून पैशांची देवाणघेवाण केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे आणि त्यानंतर त्यांचे निलंबन करण्यात आले. आता मोठी कारवाई त्यांच्यावर करण्यात आली असून रणजीत कासलेंची पोलिस दलातून थेट हकालपट्टी करण्यात आली आहे.
पुण्यातील स्वारगेट परिसरात असणाऱ्या हॉटेलमधून आज पहाटे बीड पोलिसांनी कासलेला ताब्यात घेतलं आहे. काल रात्री दिल्लीवरून पुण्यात आल्यानंतर कासले हा पुण्यात एका हॉटेलमध्ये मुक्कामी होता. मुक्कामी असतांना आज सकाळी कासलेला बीड पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. पुणे विमानतळावर काल रणजीत कासले यानं पुन्हा गंभीर आरोप केले होते. पुणे पोलिसांकडे आत्मसमर्पण केल्यानंतर बीड पोलिसांकडून त्यांना अटक होणार असल्याचं रणजित कासलेनं स्वतः सांगितलं आहे. मात्र आज पहाटे रणजीत कासले मुक्कामी असलेल्या हॉटेलमधून बीड पोलिसांनी कासलेला ताब्यात घेतलं आहे.
वाल्मिक कराडच्या बनावट चकमकीसाठी त्याला ५ - १० कोटींपासून ते ५० कोटी रुपयांपर्यंतची ऑफर देण्यात येत होती, असा दावा कासलेनं केलाय. त्यांनी या संदर्भात एक व्हिडीओ बनवून सोशल मीडियावर शेअर केलाय, ज्यामुळे बीडमध्ये पुन्हा एकदा दहशतीचे वातावरण आहे. कासलेच्या दाव्यांबद्दल विचारले असता बीड पोलिसांच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, या सर्व गोष्टी निराधार आहेत. कासलेनं त्यांच्या बोलण्यामागे पुरावे द्यावेत. ते जे काही करीत आहेत ते कामाच्या नीतिमत्तेनुसार नाही. कासलेला आधीच निलंबित करण्यात आलं आहे आणि त्याच्या विरुद्ध प्राथमिक चौकशी सुरू आहे. पोलिसांनी कासलेला नोटीस पाठवली होती.