दिल्ली: भारताचे मा. पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचे गुरुवार दि. २६ डिसेंबर रोजी दिल्लीत निधन झाले. त्यांच्या निधनानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरवर काही फोटो शेअर करत माजी पंतप्रधानांना श्रद्धांजली वाहिली. दरम्यान, डॉ. मनमोहन सिंग यांची प्रकृती बिघडल्याची माहिती मिळताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मनमोहन सिंग यांच्या कुटुंबियांना फोन करुन विचारपूस केल्याची माहिती समोर आली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटमध्ये म्हटले की, “भारतातील सर्वात प्रतिष्ठित नेते डॉ. मनमोहन सिंग यांच्या निधनाने देशात शोक व्यक्त करण्यात येत आहे. एक सामान्य पार्श्वभूमीतून ते एक प्रसिद्ध अर्थशास्त्रज्ञ बनले. अर्थमंत्रीपदासह त्यांनी अनेक मंत्रिपदे भूषवली आहेत. गेल्या काही वर्षांत आमच्या आर्थिक धोरणावर मजबूत ठसा उमटवला. संसदेतील त्यांचा हस्तक्षेपही अभ्यासपूर्ण होता. आपले पंतप्रधान या नात्याने त्यांनी लोकांचे जीवन सुधारण्यासाठी व्यापक प्रयत्न केले,” असे म्हणत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. ट्विटसोबतच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्यासोबतचे काही फोटोदेखील शेअर केले आहेत.