लोहगाव: येरवडा येथील अमरधाम हिंदू स्मशानभूमीमध्ये अंत्यसंस्कार करण्यासाठी मयताच्या नातेवाइकांकडून जास्त पैसे उकळण्याचा प्रकार सुरू असल्याचे निदर्शनास आले आहे. अस्थिरूममध्ये अस्थी ठेवण्यासाठी सुद्धा हजार ते दोन हजार रुपये वसूल केले जात असून, नुकत्याच झालेल्या एका अंत्यविधीसाठी तब्बल २२ हजार रुपये उकळल्याचे पुढे आले आहे. येरवडा स्मशानभूमीत दोन कंत्राटी कर्मचारी कार्यरत आहेत. या दाेघांकडून अमरधाम स्मशानभूमीत येणाऱ्या मयतांच्या नातेवाइकांना ग्राहक म्हणून बघतात. त्यांच्याकडून अंत्यविधीच्या नावाखाली पैसे उकळतात.
विद्युतवाहिनीसाठीही पैसे घेत असल्याच्या तक्रारी आहेत. त्यासोबत लाकूड, गोवऱ्या, डिझेलवाहिनीसाठी डिझेल हे सामान घेण्याच्या नावावर अव्वाच्या सव्वा पैसे घेऊन तेथे अंत्यविधी करू देतात. मयताचे नातेवाईक दुखवट्यामुळे मागेल ते गुपचूप देतात. याचा गैरफायदा घेत असल्याचे नागरिकांकडून सांगितले जात आहे.
याबाबत अधिक माहिती प्राप्त झाली ती अशी, गणेश देवरे (४३, रा. अमरधाम स्मशानभूमी, गुंजन चौक, येरवडा) आणि धीरज गोगावले (२५, रामनगर, येरवडा) या दोन व्यक्तींमध्ये दोन दिवसांपूर्वी वाद झाला. त्यात एकाने ‘मी कधी तुझ्या पोटावर पाय दिला काय?’ अशा स्वरूपात माेठमाेठ्याने सुरू झालेल्या संभाषणातून प्रकरण मारहाणीपर्यंत पाेहाेचले. त्यात गणेश देवरे ह्याच्या नाकाचे हाड फ्रॅक्चर झाले. याबाबत पोलिस स्टेशनला तक्रार दाखल झाली. त्यांच्या या भानगडीत मयतांच्या टाळूवरील लोणी खाण्याचा प्रकार उघडकीस आला.