पुणे: राज्यातच नव्हे तर देशभर गेल्या काही दिवसांपासून मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाची चर्चा होत आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणात पहिल्या दिवसांपासून वाल्मिक कराड आणि मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर आमदार सुरेश धस यांच्याकडून आरोप होत आहेत. या प्रकरणी मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी सातत्याने केली जात आहे. पुण्यात रविवारी झालेल्या मोर्चात आमदार सुरेश धस यांनी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप करत त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्यायचा नसेल, तर त्यांना बिनखात्याचं मंत्री करा, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली. यावेळी त्यांनी या प्रकरणातील आका १७ मोबाईल वापरायचा, असा आरोपही त्यांनी यावेळी केला.
या प्रकरणात वाल्मिक कराड यांच्यावर सुरेश धस यांनी टीका केली, की "या प्रकरणात नवीन आयटम आला आहे. त्याचं नाव नितीन बिकट असून संतोष देशमुख यांच्या हत्येची सुरुवात ही मे महिन्यापासून झाली. आमच्या इथं वेगवेगळ्या कंपन्या येऊ लागल्या. या नितीन बिकट यानं स्वतःच्याच पायाला गोळी मारून घेतली आणि कंपनीवर गुन्हा दाखल केला. हे प्रकरण हाय कोर्टापर्यंत गेलं, मात्र तिथं यांनी स्वतःच्या पायावर गोळी मारल्याचं सिद्ध झालं. मात्र ते आधी हे मिटवण्यासाठी कंपनीवाल्यांकडूनच पैसे घेतले. तिथून पुढं याचा धाराशिव बीड जिल्ह्यात वावर वाढत गेला. यानं कंपन्यांमधील सिक्युरिटीचं काम घ्यायला सुरुवात केली. याची हळूच वाल्या टोळीशी ओळख झाली. आपण एकत्र मिळून काम करू असं यांचं ठरलं आणि १४ जून रोजी वाल्मिक कराड, नितीन बिकट आणि अनंत काळकुटे आणि आवादा कंपनीचे अधिकारी शुक्ला यांची परळी इथं धनंजय मुंडे यांच्या बंगल्यावर बैठक झाली," असा आरोप सुरेश धस यांनी केला.
"पुढं अनंत काळकुटे यांच्या आय एनर्जी या कंपनी आणि आवादा कंपनीची मुंबई इथं धनंजय मुंडे यांच्यासोबत बैठक ठरली. धनंजय मुंडे यांच्या सरकारी बंगल्यावर बैठक झाली. यात आवादा कंपनीचे अल्ताफ तांबोळी, शुक्ला आणि इतर अधिकारी तसेच वाल्मिक आणि बिकट यांची बैठक झाली. बैठकीत डील ही तीन कोटीत ठरली. अल्ताफ त्यामुळे आणि शुक्ला बाहेर पडले आणि कंपनीच्या वरिष्ठांना फोन केला. वरिष्ठांनी दोन कोटीत फायनल करायला सांगितलं. त्यामुळे दोघं आतमध्ये जाऊन यांनी दोन कोटीत फायनल करा, असं सांगितलं. तेथून जाताना निवडणुकीच्या काळात त्यांनी ५० लाख रुपये आका आणि बडे आका यांना दिले," असा आरोप यावेळी धस यांनी केला. हे जर खोटं असेल तर मी राजकारण सोडेल, असं यावेळी सुरेश धस म्हणाले.
"वाल्मिक कराड हे सतरा मोबाईल नंबर वापरत होते. मी एसपी आणि सीआयडी यांना विनंती करेल की नितीन कुलकर्णी आणि आका मिळून सतरा मोबाईल वापरत असून नितीन कुलकर्णी हा सध्या गायब आहे. त्याला आणा त्यानंतरच यांनी कोणकोणत्या लोकांकडून किती घेतले, हे बाहेर येईल. माझी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच अजित पवार यांना मागणी आहे, की जोपर्यंत या प्रकरणाचा तपास पूर्ण होत नाही, तो पर्यंत धनंजय मुंडे यांना मंत्रिमंडळातून बाहेर काढा. त्यांचा राजीनामा घ्यायचा नसेल, तर बिन खात्याचं मंत्री करा," असं यावेळी सुरेश धस म्हणाले.