पुणे: सध्या पुण्यातील नामवंत असलेलं दीनानाथ मंगेशकर रूग्णालय तनिषा भिसे या गर्भवती महिलेच्या मृत्यू प्रकरणानंतर अडचणीत सापडले आहे. एकीकडे दीनानाथ मंगेशकर रूग्णालयाची मिळकत कर थकबाकी, तर दुसरीकडे तातडीच्या उपचारांपूर्वी अनामत रक्कम घेण्याच्या प्रथेविरोधात महापालिकेने पाऊल उचलले आहे. तसेच या प्रकरणात पुणे पोलिसांकडून तपास पूर्ण झाला आहे. आता या रूग्णालयाबाबतीत कोणत्या नव्या बाबी समोर येतील? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
पुणे महापालिकेच्या म्हणण्यानुसार, दीनानाथ मंगेशकर रूग्णालयावर २२ कोटी रूपयांची मिळकत कराची थकबाकी आहे. २२ कोटी रुपयांची थकबाकी भरण्यासाठी महापालिकेकडून रुग्णालयास नोटीस बजावण्यात येणार आहे. धर्मादाय कायद्यानुसार मिळकत करामध्ये सवलत द्यावी, या मागणीसाठी रूग्णालय प्रशासन २०१७ मध्ये न्यायालयात गेले होते. त्यावर अद्याप निर्णय झालेला नाही, तसेच न्यायालयाने कर वसुलीला स्थगिती देखील दिलेली नाही. त्यामुळे आता महापालिकेकडून रूग्णालयाला अधिकृत नोटीस देण्याचे निश्चत करण्यात आले आहे.
गरजू रूग्णांवर तातडीने उपचार करणे गरजेचे आहे, यावर भर देत पुणे महापालिकेने शहरातील सर्व खासगी रूग्णालयांना नोटीस पाठवली आहे. तातडीच्या उपचारांची गरज असलेल्या रूग्ण किंवा त्यांच्या नातेवाईकांकडून अनामत रक्कम घेऊ नये. तसेच रुग्णावर पहिल्यांदा उपचार करण्यास प्राधान्य द्यावे, असेही महापालिकेने रुग्णालयांना पाठविलेल्या नोटीसमध्ये नमूद केलं आहे. त्यामुळे रूग्ण आणि त्यांच्या नातेवाइकांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे.