श्रीनगर: दक्षिण काश्मिरच्या अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाममध्ये बैसरन खोऱ्यात मंगळवारी दुपारी दहशतवाद्यांनी अंदाधुंद गोळीबार केला. या हल्ल्यात २६ पर्यटकांचा मृत्यू झाला. या मृतांमध्ये महाराष्ट्रातील ६ पर्यटकांचा समावेश आहे. या हल्ल्याने संपू्र्ण देश हादरला आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील एक दहशतवादी आसिफ शेख याचे घर स्फोटकांच्या साहाय्याने उडवण्यात आले आहे.
या हल्ल्यातील सहभागी आसिफ शेखच्या मोगामा येथील घराची तपासणी करतांना एक बॉक्स मिळाला. या बॉक्समधून काही तारा बाहेर आल्या होत्या. त्यामुळे भारतीय लष्कर आणि सुरक्षा दलांला काळजी घ्यावी लागली. प्राथमिक तपासणीत यात IED स्फोटके असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला. त्यामुळे घटनास्थळी हजर असलेल्या भारतीय लष्कराच्या राष्ट्रीय रायफल्सच्या (RR) इंजीनिअरिंग पथकाने त्यात बॉम्ब असल्याच्या संशयाला दुजोरा दिला. सुरक्षेच्या दृष्टीने तो बॉक्स तिथेच नष्ट करण्यात आला. त्यामुळे जोरदार स्फोट झाला. यात कोणीही जखमी झाले नसले तरी घर मात्र, उद्ध्वस्त झाले आहे.
याशिवाय, जम्मू - काश्मीर प्रशासनाने पहलगाम दहशतवादी हल्ल्यात सहभागी स्थानिक दहशतवादी आदिल शेख याचे त्राल येथील घर देखील बुलडोझरने पाडण्यात आले.