*पूज्य बाबासाहेबांच्या नावे मते मागणाऱ्यांना धुडकावून लावा*
- *सामाजिक कार्यकर्त्या योगिता साळवी यांचा घणाघात*
- *उत्तर नागपुरात मतदार जागृती कार्यक्रमात उत्साह*
नागपूर, १५ नोव्हेंबर
ज्या लोकांनी पूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना निवडणुकीत पराभूत केले, त्यांचे पार्थिव दिल्लीहून मुंबईत आणण्यासाठी पैसे देण्यास नकार दिला, तेच लोक आज बाबासाहेबांच्या नावाने मतांचा जोगवा मागत आहेत, असा घणाघात सामाजिक कार्यकर्त्या, आंतर-धर्मीय विवाह परिवार समिती सदस्य, सेन्सॉर बोर्ड सदस्य आणि जिल्हा नियोजन समिती सदस्य योगिता साळवी यांनी केला.
निवडणुकीच्या मोसमात प्रचार सभा आणि रॅलींमध्ये मतदानाबाबत जागरुकता आणण्याचा विषय मागे पडलेला दिसतो. निःपक्ष आणि मजबूत लोकशाहीसाठी मतदारांची भूमिका सर्वात महत्त्वाची असते. हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी लोक जागरण मंच आणि इंडियन टॅक्स पेअर्स असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने एका उद्बोधन सत्राचे आयोजन उत्तर नागपुरातील जरीपटका येथील महात्मा गांधी विद्यालयाच्या सभागृहात करण्यात आले. या कार्यक्रमात योगिता साळवी प्रमुख वक्त्या म्हणून बोलत होत्या. सामाजिक कार्यकर्ते अनिल भारद्वाज आणि जरीपटका परिसरातील पुढारी मुरलीधर केवलरामानी यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते.
योगिता साळवी यांनी उपस्थित मातृशक्तीला संबोधित करताना देश आणि समाजाला प्राधान्य देणाऱ्यांना आपले बहुमोल मत देण्याचे आवाहन केले. त्या म्हणाल्या, ज्या उमेदवारांना केवळ दिखाऊपणा करून मते मिळवायची आहेत, त्यांना नाकारण्यात यावे. संविधानात प्रत्येक नागरिकाला आपला प्रतिनिधी निवडण्याचा अधिकार आहे. हा अधिकार बजावण्याचे कर्तव्य शहाणपणाने पार पाडण्याची गरज आहे.
पूज्य बाबासाहेबांच्या नावाने मते मागणाऱ्या संस्था आणि उमेदवारांपासून स्वतःला दूर ठेवा आणि आपल्या संस्कृतीचे रक्षण करण्यासाठी साथ देणाऱ्यांची निवड करा, असे आवाहनही योगिता साळवी यांनी केले. सर्व मातृशक्तीने स्वतःच्या आणि कुटुंबाच्या हिताच्या रक्षणासाठी 100 टक्के मतदान करण्याची शपथ घ्यावी, असेही त्या पुढे म्हणाल्या. राष्ट्रगीतानंतर कार्यक्रमाची सांगता झाली.