छत्रपती संभाजीनगर: नक्षलवाद्यांना धडकी भरवणारे डॅशिंग अधिकारी म्हणून महाराष्ट्रात परिचित असलेले आयपीएस अधिकारी संदीप पाटील यांनी शहर पोलिस आयुक्त पदाचा आज सकाळी पदभार स्वीकारला. यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. लोकसभा निवडणूकीच्या निकालापूर्वी त्यांनी पदभार स्वीकारल्याने सुरक्षा व्यवस्था चोख ठेवण्याचे नियोजन ते करणार आहे. पाटील यांनी नक्षलविरोधी अभियानाचे प्रमुख म्हणून नागपूर मधून कारभार सांभाळला.
यावेळी पोलीस उपायुक्त नितीन बगाटे, पोलिस उपायुक्त नवनीत काॅवत, सहायक पोलिस आयुक्त धनंजय पाटील, अशोक थोरात, सुभाष भुजंग, महेंद्र देशमुख, संपत शिंदे, पोलिस निरीक्षक अविनाश आघाव, पोलिस निरीक्षक संदीप गुरमे, संभाजी पवार आदी उपस्थित होते.
काही महिन्यांपूर्वीच त्यांची विशेष पोलीस महानिरीक्षकपदी पदोन्नती झाली होती. सांगली जिल्ह्यात जन्मलेल्या पाटील यांचे साता-याच्या सैनिकी संकुलामध्ये शिक्षण झाले. इस्लामपूर मध्ये अभियांत्रिकीचे शिक्षण घेऊन त्यांनी दिल्लीत युपिएससीची तयारी केली. त्यांची पहिली पोस्टिंग चंद्रपूर येथे झाली होती. त्यानंतर खामगाव, गडचिरोली, सातारा, पुणे ग्रामीण येथे उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे. त्यांनी तब्बल १७४ नक्षलवाद्यांना आत्मसमर्पण करायला लावून त्यांना मुख्य प्रवाहात आणले होते. मर्टीनटोलाच्या जंगलात झालेल्या चकमकीत नक्षलवाद्यांचा केंद्रीय नेता मिलिंद तेलतुंबडेसह २६ नक्षलवादी ठार झाले होते.