कल्याण: कल्याण पूर्वमध्ये एका तेरा वर्षीय मुलीचे अपहरण करून तिची हत्या झाल्याचे प्रकरण उघडकीस आले होते. या प्रकरणात पोलिसांनी आरोपी विशाल गवळी याला अटक केली आहे. बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव मधून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. या सगळ्या प्रकारात विशाल गवळी याला त्याची पत्नी साक्षी गवळी हिने साथ दिली होती. पोलिसांनी साक्षी गवळी हिला देखील अटक केली असून तिला न्यायालयासमोर हजर करण्यात आले. न्यायालयाने तिला दोन दिवसांची पोलिस कोठडी दिली आहे.
कल्याण पूर्वमध्ये सोमवारी दुपारी अल्पवयीन मुलगी घराबाहेर पडली . त्यानंतर ती बेपत्ता झाली होती. त्यानंतर मंगळवारी सकाळी बापगाव परिसरात तिचा मृतदेह सापडला. विशाल गवळी या नराधमाने तिचे अपहरण करून तिची हत्या केल्याचे उघड झाले होते. विशाल गवळी याने तिचे अपहरण करून तिची हत्या केली. त्यानंतर तिचा मृतदेह भिवंडी तालुक्यातील बापगाव येथे फेकून देण्यात आला. मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी एका रिक्षा चालकाची त्याने मदत घेतली. त्या रिक्षाचालकाला देखील अटक करण्यात आली आहे. मृतदेहाची विल्हेवाट लावल्यानंतर विशाल गवळी एका बार मध्ये दारू पिताना तो आढळला. त्याच्या चेहऱ्यावर कोणताही पश्चाताप दिसून येत नव्हता. विशाल गवळी याचा दारू पितानाचा सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आला आहे.
दरम्यान, कल्याणमधील या घटनेच्या निषेधार्थ तोंडाला काळी पट्टी बांधून शेकडो स्थानिकांनी मुक मोर्चा काढला होता. धक्कादायक बाब म्हणजे विशाल गवळी याला राजकीय पाठबळ असल्याचे देखील सांगितले जाते. जे राजकारणी लोक अशा गुन्हेगारांना पाठीशी घालतात त्यांच्यावर देखील गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी या मोर्चात करण्यात आली आहे.
दरम्यान, अपहरण होवून हत्या झालेल्या मुलीवर अत्याचार झाल्याची देखील शक्यता नाकारता येत नसल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. पोलिसांनी सहा पथके तयार करून आरोपीचा शोध घेतला. गवळी याच्यावर आतापर्यंत चार ते पाच गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली आहे. याआधी देखील विशाल गवळी याने क्लासमधून घरी जाणाऱ्या एका मुलीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला होता. त्याच्यावर आतापर्यंत बलात्कार, बलात्काराचा प्रयत्न, छेडछाड करणं, लहान मुलांचं लैंगिक शोषण करणं आशा वेगवेगळ्या गुन्ह्यांची नोंद आहे.
कल्याण पूर्व परिसरात विशाल गवळी याची दहशत आहे. त्याच्या दहशतीमुळे काही कुटुंब परिसरातून घर सोडून निघून गेल्याचं समोर आलं आहे. त्याच्यावर दाखल गुन्ह्यामधील फिर्यादिंना धमकावून तो तक्रार मागे घ्यायला लावतो असे देखील बोलले जाते. त्यामुळे त्याच्यावर नेमका कोणाचा आशीर्वाद आहे हा प्रश्न उपस्थित होतो आहे. विशाल गवळी याची आतापर्यंत तीन लग्न झाली आहेत. त्याच्या दोन बायका त्याला सोडून गेल्या आहेत. त्याची तिसरी बायको साक्षी एका खाजगी बँकेत नोकरीला आहे. ही घटना बदलापुरच्या घटनेप्रमाणेच असल्याची चर्चा परिसरात सुरू आहे.