वर्धा: दिल्लीवरून मुंबई येथे कंटेनरमधून जोडे आणि इलेक्ट्रीक साहित्याच्या आडून प्रतिबंधित असलेल्या सुगंधित तंबाखूची सुरू असलेली तस्करी स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी सापळा रचून उधळली आहे. सिंदी रेल्वे पोलीस ठाण्याच्या हद्दीतून गेलेल्या समृद्धी महामार्गावर ही कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी चालकासह एकाला अटक केली आहे तसेच पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास सापळा रचला असता दिल्लीकडून येणारा आरजे. ५२ जी. ए. ५६७० क्रमांकाचा कंटेनर येत होता. पोलिसांनी कंटेनरला थांबवून पाहणी केली असता कंटेनरमध्ये समोरील भागात इलेक्ट्रीक साहित्य आणि जोडे होते. पण, अधिक तपासणी केली असता पोलिसांना सुगंधित तंबाखूसाठा आढळून आला. त्यातच वाहतुकीसाठी वापरण्यात आलेले कंटेनर असा एकूण एक कोटी सहा लाख ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. तंबाखू दिल्ली येथून समृद्धी महामार्गाने मुंबई येथे जात असल्याचे सांगण्यात आले. तसेच हा माल दीपक ट्रान्सपोर्टचे मालक व विकास छाबडा यांचे असल्याचे सांगितले. गुन्हे शाखेच्या पोलिसांनी समृद्धी महामार्गावर सापळा रचला होता. पोलिसांनी कंटेनरची झडती घेतली असता तंबाखू आढळली.
शाहीद ईलीयास (वय ३२), हाकमखॉन शाकिरखॉन (वय २२) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. छार दीपक छाबडा (रा. दिल्ली), कंटेनर मालक अशिना विकास छाबडा (रा. दिल्ली) अशी गुन्हा दाखल केलेल्यांची नावे आहेत. समृद्धी महामार्गावरुन प्रतिबंधित असलेल्या सुगंधित तंबाखूची तस्करी होणार असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या पोलिसांना मिळाली होती.