छत्रपती संभाजीनगर: इतिहासामध्ये असंख्य ऐतिहासिक घटनांचा साक्षीदार असलेल्या देवगिरीचा किल्ला हा आगीच्या विळख्यात अडकला आहे. या आगीत अनेक प्राणी आणि वनस्पतींना धोका निर्माण झाला आहे, तसेच आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाने शर्थीचे प्रयत्न सुरू केले आहेत. देवगिरी किल्ल्याच्या परिसरात आग लागण्याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
किल्ल्याच्या चारही बाजूंनी आग लागली असून किल्ला हा आगीच्या भक्ष्यस्थानी आला आहे. आगीचे कारण समोर आलेले नसले तरी हे ऐतिहासिक वास्तूचे मोठे नुकसान मानले आहे. उन्हाळ्याच्या झळांमुळे ही आग भडकली असल्याची प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. देवगिरी किल्ल्याच्या चारही बाजूंना आगीचे लोट पसरलेले दिसून येत आहे. तसेच आसपासच्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणांत धूर पसरला असल्याचे देखील दिसून येत आहे. किल्ल्याच्या आवारामध्ये असणाऱ्या गवताला आणि झाडाझुडपांना उन्हामुळे आग लागल्याची शक्यता आहे. तसेच वाहता वारा असल्यामुळे आगीची प्रमाण वाढले. त्यामुळे किल्ला आगीच्या भक्ष्यस्थानी आला.
किल्ल्याची आग विझवण्यासाठी सिडकोचे अग्निशमन दल आणि महानगर पालिका शर्थीचे प्रयत्न करत आहे. मात्र किल्ल्याच्या आतील भागांमध्ये अग्निशमन दलाची वाहने घेऊन जाण्यास अडचण निर्माण होत आहे. दौलाताबादच्या किल्ल्याला अनेकदा वणवा लागल्याचे दिसून आले आहे. यावेळी देखील उन्हाचा तडाखा वाढल्यानंतर किल्ल्याला आग लागली आहे.