मुंबई: गेल्या काही महिन्यांपासून राज्यात मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाचा मुद्दा लावून धरला आहे. मनोज जरांगे यांनी मराठा समाजाला ओबीसीमधूनच आरक्षण देण्याच्या मागणीबाबत सरकारने अद्यापही कोणताही ठोस निर्णय घेतलेला नाही. आता राज्यात पुन्हा एकदा महायुतीचं सरकार आलं असून देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले आहेत. दरम्यान, मनोज जरांगे यांनी आता पुन्हा एकदा मराठा आरक्षणाच्या प्रश्नांवरून राज्य सरकारला मोठा इशारा दिला आहे. त्याला मुख्यमंत्र्यांनीही प्रत्युत्तर दिलं आहे.
येत्या २५ जानेवारीपासून पुन्हा एकदा उपोषणाला सुरुवात करणार असल्याचं मनोज जरांगे यांनी जाहीर केलं आहे. पार्श्वभूमीवर बोलताना मनोज जरांगे यांनी पुन्हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर नाव न घेता टीका केली. मनोज जरांगे पाटील यांनी परभणी दौऱ्यावर असताना, “आता खरी मजा आहे, हिशेब चुकता करण्याची. आधी ते दुसऱ्यांवर ढकलत होते. पण आता कळेल की आरक्षण देतात की नाही”, असं त्यांना म्हटलं आहे.