मुंबई: बीडच्या मस्साजोगचे सरसपंच संतोष देशमुख यांची अत्यंत क्रूर पद्धतीने हत्या करण्यात आली. ९ डिसेंबरला आधी त्यांचं अपहरण करण्यात आलं आणि त्यानंतर त्यांना अत्यंत क्रूरपणे ठार करण्यात आलं. या हत्याप्रकरणावरुन राज्यभरातील वातावरण प्रचंड तापले आहे. राज्यातील सर्व स्तरातून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहे.
या प्रकरणात वाल्मिक कराड हाच मास्टर माईंड आहे, असा आरोप केला जात आहे. तसंच वाल्मिक कराड धनंजय मुंडेंचा खास माणूस आहे त्यामुळे धनंजय मुंडेंनी राजीनामा द्यावा अशी मागणी होते आहे. अशातच आता दिवंगत प्रवीण महाजन यांच्या पत्नी सारंगी महाजन यांनी पंकजा मुंडे, धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांच्याबाबत खळबळजनक दावा केला आहे
सारंगी महाजन म्हणाल्या, की “मी सह्याद्री अतिथीगृहावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटणार आहे. आज मी अजित पवार यांनाही भेटले. माझी जमीन धनंजय (धनंजय मुंडे) आणि त्याच्या माणसांनी हडप केली आहे. गोविंद मुंडे हा त्यांच्या घरचा नोकर आहे. मला आणि माझ्या कुटुंबाला धाक दाखवून त्याने माझी जमीन हडप केली. कोऱ्या कागदांवर, १०० रुपयांच्या स्टँप पेपरवर सह्या घेतल्या आणि त्या देत नाही तोपर्यंत परळी सोडू देणार नाही, असा धाक दाखवला. त्यामुळे आम्ही विचार केला की एवढं जमिनीत काय? की आमची जमीन हडप केली.” असा प्रश्न सारंगी महाजन यांनी विचारला आहे.