मुंबई: NCERT ने इयत्ता ७ वीच्या सामाजिक विज्ञानाच्या पुस्तकात मोठे बदल केले आहेत. नवीन पुस्तकांमधून मुघल आणि दिल्लीच्या सत्तेसंबंधी अध्याय हटवण्यात आले असून त्याऐवजी प्राचीन राजवंश, पवित्र भूगोल आणि मेक इन इंडिया व बेटी बचाओ, बेटी पढाओ सारख्या सरकारी योजनांवर आधारित नवीन अध्याय समाविष्ट करण्यात आले आहेत.
NCERT च्या सध्या प्रकाशित झालेल्या पुस्तकांचा पहिला भाग उपलब्ध आहे. दुसरा भाग पुढील काही महिन्यांत येणार आहे. याच दरम्यान अधिकाऱ्यांनी हे स्पष्ट केलेले नाही की हटवलेले अध्याय पुढील भागात समाविष्ट होतील की नाही. नवीन पुस्तक Exploring Society: India and Beyond मध्ये आता मौर्य, मगध, शुंग आणि सातवाहन यांसारख्या प्राचीन भारतीय राजवंशांवर आधारित अध्याय आहेत.
हे बदल नवी शिक्षणधोरण आणि २०२३ मधील नॅशनल करिक्युलम फ्रेमवर्क फॉर स्कूल एज्युकेशन नुसार करण्यात आले आहेत. ज्यामध्ये भारताच्या परंपरा, ज्ञानप्रणाली आणि स्थानिक संदर्भांना प्राधान्य देण्यावर भर देण्यात आला आहे. नवीन पुस्तकांमध्ये विद्यार्थ्यांना How the Land Becomes Sacred या अध्यायामधून भारतातील धार्मिक स्थळे आणि तीर्थयात्रांविषयी माहिती दिली जाते. यामध्ये चारधाम यात्रा, १२ ज्योतिर्लिंग, शक्ती पीठे तसेच नद्यांचे संगम, डोंगर आणि अरण्य यांना पवित्र स्थळ म्हणून दर्शवण्यात आले आहे. अलीकडे प्रयागराज येथे झालेल्या महाकुंभ मेळ्यात सहभागी झालेल्या ६६ कोटी भाविकांचा उल्लेखही पुस्तकात आहे.