मुंबई: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज्याचे मुख्यमंत्री असतांना दावोसचा मुद्दा राज्यात चर्चेचा विषय ठरला होता. कारण मुख्यमंत्र्यांच्या दावोस दौऱ्यात अनेक कोटी रुपयांचा खर्च झाल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात होता. विशेष म्हणजे उद्योग महाराष्ट्रात आले नाही पण मंत्री दावोसची पिकनीक करत असल्याचाही आरोपी विरोधक करत होते. मात्र नव्या महायुती सरकारच्या काळात प्रथमच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दावोस दौरा करणार आहेत. येत्या २० ते २४ जानेवारी या काळात दावोसमध्ये वर्ल्ड इकोनॉमिक फोरममध्ये सहभागी होणार आहेत. यासाठी १९ तारखेला पहाटे ते मुंबईतून रवाना होणार आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे भरगच्च कार्यक्रम दावोस दौर्यात राहणार आहेत. अनेक जागतिक नेत्यांच्याही ते भेटी घेणार आहेत. या दौर्यात उद्योगमंत्री उदय सामंत तसेच एमआयडीसी, एमएमआरडीए, सिडको अधिकार्यांचे शिष्टमंडळ त्यांच्यासोबत असणार आहे. डेटा सेंटर्स, ऑटोमोबाईल्स, सेमिकंडक्टर, ईव्ही, इलेक्ट्रॉनिक्स, स्टील, अन्नप्रक्रिया, वस्त्रोद्योग, औषधी आणि पायाभूत सुविधा इत्यादी क्षेत्रात मोठ्या संख्येने सामंजस्य करार या दौर्यात होणार आहेत. महाराष्ट्राच्या सर्वांगिण विकासाला चालना देण्याचा मुख्यमंत्री फडणवीस दावोस दौऱ्यातून प्रयत्न करणार आहेत.