बीड: बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्र पेटून उठला आहे. ९ डिसेंबर रोजी संतोष देशमुख यांचं अपहरण करून त्यांची निर्घृण हत्या करण्यात आली होती. सुदर्शन घुले याने पवनचक्की कंपनीच्या सुरक्षा रक्षकाला मारहाण केली होती. यात संतोष देशमुखांनी हस्तक्षेप केला होता. सुदर्शन घुलेसह त्याच्या साथीदारांनी ही हत्या केल्याचं प्राथमिक तपासातून समोर आलं आहे. यातूनच सुदर्शन घुलेसह इतर आरोपींनी संतोष देशमुखांचं अपहरण करून त्यांचा जीव घेतला.
या हत्येत सुदर्शन घुलेचा प्रत्यक्ष सहभाग असला तरी या गुन्ह्यामुळे वाल्मीक कराडच खरा म्होरक्या असल्याचा आरोप सुरुवातीपासून होत आहे. वाल्मीक कराडला अटक करावी, यासाठी राज्यभरात मोठी आंदोलनं देखील झाली. अलीकडेच वाल्मीक कराडला अटक करून त्याच्यावर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. या सगळ्या प्रकरणाचा खरा सूत्रधार वाल्मीक कराड हाच असल्याचा आरोप सुरुवातीपासून होत आहे. पण सीआयडीच्या तपासात वेगळाच खुलासा समोर आला आहे.
सीआयडीने संतोष देशमुख हत्या प्रकरणात सुदर्शन घुले याला गँगचा लीडर दाखवलं आहे, तर वाल्मीक कराड हा सुदर्शन घुलेच्या गँगचा सदस्य असल्याचं म्हटलं आहे. सीआयडीच्या या खुलाशानंतर वाल्मीक कराड नव्हे, तर सुदर्शन घुले हाच खरा मास्टरमाइंड असल्याची चर्चा सुरू झाली आहे. या प्रकरणात आणखी काही आरोपींचा सहभाग असू शकतो, असाही अंदाज वर्तवण्यात येत आहे. त्या अनुषंगाने तपास केला जात आहे.