नवी दिल्ली: रावणाचा वध त्याच्या कल्याणासाठी झाला. शिवभक्त रावण, वेद ज्ञात असणारा रावण, उत्तम प्रशासक असणारा रावण, असे चांगले गुण रावणाकडे होतेच; पण त्याने जे शरीर, मन, बुद्धी स्वीकारली, त्यामुळे हे चांगले गुण त्याच्यात भिनले नाहीत. त्यामुळे ते शरीर, मन आणि बुद्धी संपवली गेली. या कारणानेच रावणाचा संहार झाला. रावणाचा संहार म्हणजे हिंसा नाही, तर अहिंसाच आहे. अहिंसा आपला धर्म आहे; पण आततायी लोकांकडून मार न खाणे आणि गुंडगिरी करणार्यांना धडा शिकवणे, हादेखील आपला धर्म आहे, असे विधान सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी केले. ते येथे स्वामी विज्ञानंद यांच्या हिंदू मॅनिफेस्टो या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्याच्या कार्यक्रमात पहलगाम येथील आतंकवादी आक्रमणाच्या पार्श्वभूमीवर बोलत होते.
यावेळी बोलतांना ते म्हणाले, की अहिंसा हे भारताचे मूल्य आहे. तो भारताचा विचार आहे. आपली अहिंसा लोकांना अहिंसक करण्यासाठी आहे. काही लोक अहिंसक होतील; पण काही होणार नाहीत. तुम्ही काहीही करा; पण ते अहिंसक कधीच होणार नाहीत. पाश्चिमात्य विचारसरणीत या हिंसक आणि अहिंसक या दोन्ही गोष्टी एकसंधपणे चालत नाहीत. पाश्चात्त्यांमध्ये शत्रू म्हटला की, त्याला संपवा, मग तो चांगला असो कि वाईट, हे पाहिले जात नाही. आपल्याकडे शत्रू चांगला आहे की वाईट? हे पाहिले जाते. त्यामुळे त्यांचे कल्याण व्हावे; म्हणून शिक्षा देऊन आपण त्यांना सोडतो. आपण समतोल राखतो.
तसेच, आपण कधीही शेजारी राष्ट्रांचा अपमान करत नाही. त्यांना हानी पोचवली जाईल, असे कृत्य करत नाही. तरीही कुणी वाईटपणानेच वागणार असेल, तर दुसरा उपाय काय ? राजाचे कर्तव्य आहे प्रजेचे रक्षण करणे. गीतेमध्ये अहिंसेचा उपदेश आहे. तो उपदेश अशासाठी करण्यात आला की, अर्जुनाने लढावे आणि शत्रूला मारावे; कारण त्या वेळी असे लोक अर्जुनासमोर होते ज्यांचा उत्कर्षासाठी वेगळा मार्गच उरला नव्हता. आपली भूमिका संतुलन राखणारी आहे. आपणही ते संतुलन विसरलो आहोत. संतुलित ठेवणारा आपला धर्म आहे.