मुंबई: राज्य सरकारच्या महत्त्वाच्या अशा लाडकी बहीण योजनेतील आर्थिक मदत कमी करण्यात आल्याच्या बातम्यांवरून राजकारण चांगलेच रंगलेले दिसत आहे. विरोधकांनी सरकारवर टीका करतांना शासनाकडे निधी नाही, म्हणून योजना बंद करण्याचा डाव आखला जात असल्याचा आरोपा केला आहे. मात्र या पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी स्पष्टीकरण देत लाडकी बहीण योजना सुरूच राहणार असल्याचे ठामपणे सांगितले आहे.
मंगळवारी रात्री पत्रकारांशी संवाद साधतांना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, की लाडकी बहीण’ योजना रद्द करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. योजनेसाठी अर्थसंकल्पीय तरतूद करण्यात आली आहे आणि ती योजना सुरूच राहील.
योजनेतील या बदलावरून विरोधकांनी सरकारवर आर्थिक असमर्थतेचा ठपका ठेवला आहे. मात्र, अजित पवार आणि अदिती तटकरे यांनी हा आरोप फेटाळून लावत योजनेची अंमलबजावणी सुरूच राहणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
या योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील महिलांना दरमहा १,५०० रुपयांची आर्थिक मदत देण्यात येते. गेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या विजयात या योजनेचे महत्त्वाचे योगदान होते, असा दावा सत्ताधारी पक्षांकडून करण्यात आला आहे. महायुतीमध्ये भाजप, शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांचा समावेश आहे.