छत्रपती संभाजीनगर: राज्यामध्ये वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये सध्या जल संकट निर्माण झाले आहे. मुंबईनंतर आता शिवसेना उबाठा गट छत्रपती संभाजीनगर शहरात 'लबाडांनो पाणी द्या' आंदोलन करणार आहे. एक महिना हे आंदोलन चालणार आहे, प्रत्येक वॉर्डांत वेगवेगळं अभियान राबवण्यात येणार आहे. नवीन जलवाहिनी कधी तयार होईल? यापेक्षा येणाऱ्या पाण्याचं नियोजन का नाही? त्यासाठी हे आंदोलन असल्याची माहिती विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी दिली आहे.
विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी "मनपा आयुक्त आयपीएल सामने पाहण्यात व्यस्त आहेत, त्यांनी नियोजन केलं तर योग्य पाणी मिळू शकते. मनपानं पाण्याचं आश्वासन दिलं तर आंदोलन रद्द करू, मात्र पाणी द्या," असं आवाहन पत्रकार परिषदेत केलं आहे. छत्रपती संभाजीनगर शहराची गरज २४० एनएलडी इतकी आहे, तर जायकवाडी इथून मिळणारं पाणी जवळपास १४० एनएलडी इतकं आहे, असं असतांना नागरिकांना कधी आठ तर कधी दहा दिवसाला पाणी मिळत आहे.
पाण्याचं नियोजन केल्यास एक दिवसाआड पाणी देणं शक्य असतांना ते का होऊ शकत नाही? हा प्रश्न असल्याचं विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सांगितलं. त्यामुळे नवीन पाणी योजना कधी होणार? यापेक्षा आहे त्या पाण्याचं नियोजन करण्यासाठी हे आंदोलन असल्याचं अंबादास दानवे यांनी सांगितलं आहे. एक दोन नाही तर एक महिना सलग आंदोलनाचं नियोजन केल्याचं अंबादास दानवे यांनी सांगितलं आहे.
१८ एप्रिलपासून रोज वेगवेगळ्या प्रकारचं आंदोलन केलं जाणार आहे. सुरुवातीला शहरातील येणाऱ्या मार्गांवर हंडा तोरण उभारून पक्षातील नेते आंदोलन करतील. त्या नंतर प्रत्येक वॉर्डात जनजागृती मोहीम, हंडा मोर्चा, स्वाक्षरी मोहीम, सायकल आंदोलन, रिकाम्या हंड्यांचं, टाक्यांचं पूजन, महिला आघाडीतर्फे निवेदन, पाणी प्रश्नावर आधारित फोटो प्रदर्शन केलं जाईल. तर शेवटच्या दिवशी पक्षाचे नेते आदित्य ठाकरे किंवा उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत आंदोलन सभा होईल, अशी माहिती अंबादास दानवे यांनी दिली आहे.