छत्रपती संभाजीनगर: मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांना आज बुधवारी पहाटे भूकंपाचे तीव्र धक्के जाणवले. रिश्टर स्केलवर या भूकंपाची तीव्रता ४.५ इतकी नोंदवली गेली. हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यातील रामेश्वर तांडा हे भूकंपाचे केंद्रस्थान असावे, असे सांगण्यात आलं आहे. भूकंपामुळे काही घरांना तडे देखील गेल्याचं वृत्त आहे. दरम्यान, या भूकंपाचा थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ, वसमत तालुक्यातील अनेक गावांना भूकंपाचे हादरे बसले. माळधामणी गावात भूकंपाच्या घटनेनंतर अचानक जमिन हादरल्याने नागरिक घराच्याबाहेर पळाले आहेत. व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की, एक व्यक्ती रस्त्याने पायी चालत जाताना दिसून येत आहे.
तर काहीजण घराच्या पायऱ्यांवर बसून गप्पा मारत आहेत. त्याचवेळी अचानक जमिनीतून गुढ आवाज होऊन भूकंपाचा धक्का बसतो. घरातील भांड्यांची तसेच इतर वस्तूंची पडझड होण्याचा आवाज येतो. जमीन हादरत असल्याचं लक्षात येताच नागरिक चांगलेच धास्तावतात. सर्वजण आरडाओरड करत मोकळ्या जागेत पळत सुटतात.