नाशिक: नाशिक पोलिसांनी १५ दिवसांपूर्वी शहरातील काठे गल्ली परिसरात असणाऱ्या अनाधिकृत सातपीर दर्ग्याचे बांधकाम हटवण्याची नोटीस दिली होती. मात्र, कालपर्यंत दर्ग्याचे बांधकाम हटवण्यात आले नव्हते. त्यामुळे नाशिक पोलिसांनी आणि महानगरपालिकेने आज बुधवारी पहाटे साडेपाच वाजेच्या सुमारास अनधिकृत बांधकाम हटविण्यास सुरुवात केली.
तत्पूर्वी काल रात्री दर्ग्यातील इस्लाम स्कॉलर आणि प्रशासनाने मिळून धार्मिक प्रक्रिया पार पाडली. त्यानंतर पहाटे साडेपाच वाजता अनधिकृत बांधकाम तोडण्यास सुरुवात झाली. त्यापूर्वी दर्गा परिसरात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. मात्र, मंगळवारी रात्री दीड ते दोन वाजता या ठिकाणी आलेल्या जमावाने अचानक पोलिसांवर तुफान दगडफेक केली. यामध्ये चार अधिकारी आणि ११ पोलिस जखमी झाले असून, त्यांच्या हात - पायाला जखमा झाल्या आहेत.
दरम्यान, परिस्थिती हाताबाहेर गेल्याने पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडून जमावाला पांगवले. यानंतर आज सकाळपासून येथील परिस्थिती नियंत्रणात आली आहे. तसेच काठे गल्ली या भागातील वाहतूक इतरत्र वळवण्यात आली आहे. सातपीर दर्ग्याचे अनधिकृत बांधकाम ९० टक्के हटवण्यात आले आहे. आता केवळ लोखंडी भाग हटवण्याचे काम बाकी आहे. त्यासाठी नाशिक महानगरपालिकेकडून युद्धपातळीवर या दर्ग्याच्या बांधकामाचा उरलेला काही भाग बुलझोडरच्या सहाय्याने हटविला जात आहे.
सध्या काठे गल्ली भागात पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली असून, काठे गल्ली ते भाभा नगरच्या दिशेने जाणारी वाहतूक इतर मार्गाने वळवण्यात आली आहे. सातपीर दर्ग्याचे अनधिकृत बांधकाम हटवण्यावेळी दंगल घडविणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तर १५ जणांना ताब्यात घेण्यात आले असून, ५७ दुचाकी इंटरसेप्ट करण्यात आले आहेत.
कोठे गल्ली परिसरातील अनधिकृत दर्गा हटवण्याची मागणी गेल्या अनेक वर्षापासून होत होती. यासाठी मागील महिन्यातच काही हिंदुत्ववादी संघटनांनी आंदोलन देखील केले होते. त्यासाठी वक्फ बोर्ड आणि उच्च न्यायालयात देखील या संदर्भात सुनावणी झाली होती. उच्च न्यायालयात दर्ग्याच्या जागेबाबत दर्गा प्रशासनाला काहीही पुरावे सादर करता आले नाही. त्यामुळे उच्च न्यायालयात दर्गा अनधिकृत ठरवण्यात आला होता.
नाशिक हे धार्मिक आणि सांस्कृतिक वारशासाठी ओळखले जाणारे शहर आहे. गोदावरी नदीच्या तीरावर वसलेले हे शहर मंदिरांची नगरी म्हणूनही प्रसिद्ध आहे. मात्र, अशा घटनांमुळे शहरातील सामाजिक सलोख्यावर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अनाधिकृत बांधकाम हटविल्याने जर पोलिसांवर हल्ले होत असेल, तर सर्वसामान्य नागरिकांचे काय? असा प्रश्न संतप्त हिंदू समाजाच्या मनात निर्माण झाला आहे.