दुचाकीस्वार चोरट्यांनी सेवानिवृत्त शिक्षकाची 9 लाखाची रोकड लांबवली
पाठलाग करताना दुचाकी घसरल्याने शिक्षकाचा मुलगा जखमी
तळोदा- सेवानिवृत्तीची 9 लाखाची रक्कम मोटारसायकल वर येवून चोरट्यांनी धूम स्टाइलने हातातून हिसकावून लूट केल्याची घटना मंगळवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास घडली. सोबत असलेल्या शिक्षकाच्या मुलाने चोरट्यांच्या पाठलाग केला, मात्र पाठलाग करत असताना दुचाकी घसरून मुलगा गंभीर जखमी झाला.
तळोदा तालुक्यातील तळवे येथील सेवानिवृत्त शिक्षक देविदास मंगा मराठे हे नुकतेच सेवानिवृत्त झाले असून त्यांच्या सेवानिवृत्तीची रक्कम तळोद्यातील स्टेट बँक ऑफ इंडिया या शाखेत जमा झाली होती. त्यातील 9 लाखाची रक्कम काढण्यासाठी शिक्षक मराठे यांनी सोमवारी चेक दिला होता. मात्र बँकेत कॅश नसल्याने त्यांना मंगळवारी बोलवले होते. त्यानुसार ते 9 लाख रुपये काढण्यासाठी गेले. त्यांना 9 लाखाची रक्कम बँकेने हातात दिल्यानंतर ते बँके बाहेर पडले. त्यांच्या मुलाने मोटारसायकल काढली व देविदास मराठे हे गाडी वर बसत असतांना पाळत ठेवून असलेल्या चोरट्यांनी त्याच्या हातातून पैशाची पिशवी हिसकावून धूम स्टाईल ने पळ काढला. दरम्यान शिक्षक सोबत असलेला त्यांचा मुलगा संकेत मराठे याने त्या चोरट्याचा मोटारसायकलने पाठलाग केला. शहादा रस्त्यावर पाठलाग करत असताना संकेत मराठे हे मोटारसायकल वरून घसरले त्यात ते गँभिर जखमी झालेत. त्यांना शहरातील दवाखान्यात प्राथमिक उपचार करून नंदुरबार येथे हलविण्यात आले. मराठे यांनी चोरीस गेलेली रक्कमेबाबत पोलिसात माहिती दिल्याने पोलिसांनी घटना स्थळी भेट देत बँकेतील व परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासणीचे काम सुरू केले आहे. यावेळी एलसीबीचे पोलीस निरीक्षक किरणकुमार खेडकर, निरीक्षक राजू लोखंडे, पोलीस उपनिरीक्षक धर्मेंद्र पवार, सुधीर गायकवाड यांनी घटनास्थळी भेट दिली.