गडचिरोली: अहेरी विधानसभा मतदारसंघात निवडणुकीच्या रणधुमाळीने जोर धरला असताना, प्रचारादरम्यान जनतेच्या जिव्हाळ्याचे प्रश्न मात्र दुर्लक्षित होत असल्याचे चित्र समोर येत आहे. महायुती, महाविकास आघाडी आणि इतर पक्षांचे उमेदवार मतदारांना भुरळ घालण्यासाठी जोरदार प्रचार करत आहेत. मात्र, बेरोजगारी, शेतकऱ्यांचे प्रश्न, अर्धवट पडलेली विकासकामे, वाढती महागाई, शासकीय रिक्त पदे,आणि पर्यावरणीय हानीसारख्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चेचा अभाव असल्याने मतदारांमध्ये नाराजी आहे.
अहेरी विधानसभा अंतर्गत येणाऱ्या एटापल्ली तालुक्यातील सुरजागड लोहखन प्रकल्पावरून स्थानिकांचा रोष उफाळून आला आहे. हा प्रकल्प स्थानिकांना रोजगार देईल, असे वचन देण्यात आले होते, मात्र प्रत्यक्षात बाहेर राज्यांतील मजुरांना प्राधान्य दिले जात आहे. या प्रकल्पामुळे येथील स्थानिक युवक बेरोजगार राहत असून, त्यांच्या जिव्हाळ्याच्या हक्कांवर गदा येत आहे.
अशात सुरजागड प्रकल्पामुळे पर्यावरणावर गंभीर परिणाम होत आहेत. मोठ्या प्रमाणावर मालवाहतुकीमुळे तालुक्यातील रस्ते अक्षरशः उद्ध्वस्त झाले आहेत. रस्त्यांवरील खड्डे, धुळीचे साम्राज्य, आणि दररोज घडणारे अपघात हे येथील जनतेच्या दैनंदिन जीवनाचा भाग झाले आहेत. या रस्त्यांच्या दुरुस्तीबाबत प्रशासनाकडून कोणतीही ठोस उपाययोजना करण्यात आलेली नाही.
याशिवाय, लोहखननामुळे वनक्षेत्राचा ऱ्हास होत असून, याचा परिणाम येथील जैवविविधतेवर होत आहे. जलस्रोत कमी होत आहेत, जमिनीची धूप वाढत आहे, आणि यामुळे शेतकऱ्यांना शेती करण्यास अडचणी येत आहेत
सध्या उमेदवार भावनिक आणि धार्मिक मुद्द्यांवर फोकस करून प्रचार करत आहेत. या मुद्द्यांमुळे प्रचारसभांमध्ये चिखलफेक आणि आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. मात्र, जनतेच्या समस्या मात्र प्रचारमोहिमेतून गायब आहेत.
अहेरी विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात स्थानिक बेरोजगारी, शेतकऱ्यांचे प्रश्न, आणि पर्यावरणीय हानीसारख्या गंभीर मुद्द्यांना दुय्यम स्थान दिले जात आहे. सुरजागड लोहखन प्रकल्पासारख्या महत्त्वाच्या विषयांवर कोणत्याही पक्षाचा ठोस अजेंडा नसल्याने सामान्य लोकांमध्ये अस्वस्थता आहे.
मुकेश कावळे, गडचिरोली...