मुंबई: सह्याद्री अतिथीगृह येथे वैद्यकीय शिक्षण, अन्न व औषध प्रशासन व सामान्य प्रशासन विभाग यांच्या पुढील १०० दिवस आराखड्याच्या अनुषंगाने बैठक झाली, या बैठकीत मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. शासकीय रुग्णालयात रुग्णांसाठी अधिकाधिक सेवा अद्यावत करून त्या अधिक दर्जेदार द्याव्यात. वैद्यकीय शिक्षण अंतर्गत असलेल्या सर्व शैक्षणिक संस्थांचे बळकटीकरण करा. औषध व अन्नपदार्थ मधील भेसळीला प्रतिबंध करण्यासाठी काटेकोर उपाययोजना करावी. भविष्यातील आव्हाने ओळखुन प्रशासन गतिमान करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा, अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केल्या आहेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, वैद्यकीय शिक्षण विभागाअंतर्गत रक्तदान मोहीम, अवयव दान,स्तनाचा कर्करोग जनजागृती आणि उपचार, लठ्ठपणा जनजागृती आणि उपचार, मिशन थायरॉईड, अंधत्व प्रतिबंधात्मक उपाय योजना,मिशन मौखिक आरोग्य मोहीमांची प्रभावी अंमलबजावणी करावी. वैद्यकीय शिक्षण महाविद्यालय परिसरातील विद्यार्थी आणि परिसर सुरक्षिततेसाठी सीसीटीव्ही कार्यान्वित करणे, आयुर्वेदिक महाविद्यालयामार्फत प्रकृती परीक्षण अभियान, योगा सेंटरची स्थापना, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांच्या छतावरती सौर ऊर्जा यंत्रणा कार्यान्वित करणे, वैद्यकीय संशोधन केंद्रांचे बळकटीकरण करणे, महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना अधिक लोकाभिमुख करा व योजनेत सुधारणा करणे, वैद्यकीय शिक्षण घेणा-या विद्यार्थ्यांच्या प्रवेश प्रक्रियेपासून ते उत्तीर्ण होईपर्यंतच्या शैक्षणिक प्रक्रियेचे व्यवस्थापन पुढील शंभर दिवसात प्राधान्याने करा.