छत्रपती संभाजीनगर: औरंगजेबने नागरिकांवर प्रचंड अन्याय, अत्याचार केले. त्यांचा धर्म बदलण्याचा प्रयत्न केला. मात्र तरीही काही लोकं त्याला नायक मानतात. या लोकांनी पंडित नेहरू यांचं पुस्तक वाचावं, म्हणजे औरंगजेब किती क्रूर राजा होता, याची प्रचिती येईल, असा हल्लाबोल केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी केला. राजनाथ सिंह यांच्या हस्ते महाराणा प्रताप यांच्या अश्वारूढ पुतळ्याचं कॅनॉट परिसरात अनावरण करण्यात आलं. यावेळी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री संजय शिरसाट, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यासह खासदार आणि आमदारांची उपस्थिती होती.
यावेळी बोलतांना केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह म्हणाले, की मातृभूमीच्या रक्षणासाठी सर्वस्व अर्पण करणारे महाराणा प्रताप हे इतिहासातील अद्वितीय योद्धे होते. त्यांच्या पुतळ्याचं छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमीत अनावरण करतांना मला अभिमान वाटतो, अशा शब्दांत त्यांनी महाराणा प्रताप यांच्या कार्याला मानवंदना दिली.
महाराणा प्रताप यांच्या १६ फुटी अश्वारूढ पुतळ्याचं अनावरण शुक्रवारी छत्रपती संभाजीनगरातील कॅनॉट गार्डन इथं त्यांच्या हस्ते करण्यात आलं. छत्रपती शिवाजी महाराज आणि महाराणा प्रताप यांच्या कार्यात साम्य असल्याचं नमूद करत राजनाथ सिंह म्हणाले.
आपल्याला इतिहासाच्या नावाखाली अर्धसत्य शिकवण्यात आल्याची टीका करत त्यांनी केली. आपल्याला महाराणा प्रताप आणि शिवाजी महाराजांचा संपूर्ण आणि खरा इतिहास शिकवण्यात आला नाही. स्वातंत्र्यानंतर या राजांचा चुकीचा इतिहास मांडण्याचा प्रयत्न केला गेला. तर त्याऐवजी औरंगजेबासारख्या अत्याचारी राजाचा गौरव करण्याचा प्रयत्न झाला. काही लोकं आजही त्याला नायक म्हणून मांडत आहेत, जे दुर्दैवी आहे. तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी लिहिलेलं पुस्तक वाचा, अनेक गोष्टी वेगळ्या आहेत. धर्मपरिवर्तन करणारा, हिंदू संस्थांना नष्ट करणारा, सनातन विरोध करणारा राजा नायक कसा असू शकतो? असं त्यात सांगितलं. आम्ही केवळ औरंगाबादचं नाव बदलून संभाजीनगर केलं, यात चूक काहीच नाही," असं राजनाथ सिंह यांनी सांगितलं.