छत्रपती संभाजीनगर: देशभरात माध्यमे दाखवित असलेली सर्व्हे कंपन्यांचे एक्झिट पोल खोटे ठरणार असल्याचा दावा शिवसेना नेते तथा विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी व्यक्त केला. शहरातील अजबनगर निवासस्थानी रविवार ता. २ जून रोजी माध्यमांशी संवाद साधताना ते बोलत होते.
महाराष्ट्रात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली पक्षाला मोठं यश मिळणार आहे. जनमत उध्दव ठाकरे यांच्या बाजूने असून महाविकास आघाडीसह आम्ही पुढे जात आहोत. ह्या सार्वत्रिक निवडणुकीत महाविकास आघाडी ३० जागांवर विजयी होईल, असा आशावाद दानवे यांनी व्यक्त केला.
सर्वेक्षण करणाऱ्या अनेक कंपन्या भाजपाच्या बटीक झाल्या असून १०० टक्के देशात व राज्यात त्यांच्या जागा कमी होणार असल्याचा टोला दानवे यांनी लगावला. भाजपाने दिलेला ४०० पार चा नारा एकही संस्थेच्या सर्वेक्षणात पार होताना दिसत नाही. महाराष्ट्रात ही भाजपाला दाखवण्यात आलेले सर्वेक्षण चुकीचे ठरणार आहे. त्यांची युती मिळून देखील 30 जागा मिळणार नसून देवेंद्र फडणवीस सर्वमान्य नेते नसल्याचा टोलाही अंबादास दानवे यांनी लागवला.
कर्नाटकात मागील वेळेस भाजपाचे शासन होते आता काँग्रेस सत्तेवर असून त्यांच्या बाजूने जनमत कौल आहे. रेवन्ना प्रकरणाचा भाजपावर विपरीत परिणाम होणार आहे.मतदानाच्या शेवटच्या टप्यामध्ये मोदींचा भाषणातील तोल घसरला होता त्यामुळे त्यांना फारसे यश मिळणार नसल्याची गाव्ही दानवे यांनी दिली.
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रात ३० प्रचार सभा घेतल्या.निवडणुकी दरम्यान त्यांनी देशातील कामकाजाकडे लक्ष दिले नाही. वेळ गेल्यावर बैठका घेऊन काहीही होणार नसल्याचे मोदी आज दिल्लीत घेत असलेल्या विविध बैठकांवर अंबादास दानवे म्हणाले. निवडणूक आदर्श आचार संहिता जनतेच्या कामकाजासाठी काही प्रमाणात शिथिल झाली पाहिजे अशी मागणी दानवे यांनी केली.
राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी संभाजीनगर येथे बैठक घेतली असली तरीही टंचाईग्रस्त आराखडा तयार केला नाही. जिल्ह्यातील पिंपळखुट्टा येथील शेतकऱ्याने बँकेकडे शेती गहाण ठेवून सुद्दा त्याला पीक कर्ज दिले गेले नाही. यामुळे नैराश्यात येऊन त्या शेतकऱ्याने आत्महत्या केली.राज्यात मागील काही दिवसांत २६० शेतकऱ्यांनी आत्महत्या असून पीक कर्ज नाकारत असल्याने मी काही बँक व कृषी विभागाशी चर्चा करणार असल्याची माहिती अंबादास दानवे यांनी दिली.